नाशिक : सिडकोतील प्रभाग क्रमांक ३१ विविध समस्यांनी त्रस्त आहे. पाणीटंचाई, खराब रस्ते, अपूर्ण वीज व्यवस्था आणि दुभाजकांची कमतरता यामुळे रहिवाशांमधील असंतोषाला वाट करुन देण्यासाठी राज्यातील सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजपतर्फे बाळकृष्ण शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली सिडको विभागीय कार्यालयावर शुक्रवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चात महिलांचा विशेष सहभाग होता. त्यांनी डोक्यावर पाण्याचे हंडे घेऊन आणि हातात भाजपचे झेंडे घेऊन जोरदार घोषणाबाजी केली.

प्रभाग क्रमांक ३१ मधील रहिवाशांना सातत्याने वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कृत्रिम पाणी टंचाई, खराब रस्ते , वाहतूक कोंडी, अशा समस्या नेहमीच्या झाल्या आहेत. याविरुध्द आवाज उठविण्यासाठी काढण्यात आलेल्या मोर्चात पाथर्डी, सराफ नगर, जायभावे नगर, ज्ञानेश्वर नगर, मुरलीधर नगर आणि वासन नगर येथील रहिवासी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. महिलांबरोबरच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही मोर्चात सामील झाले होते. घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.

आंदोलकांना सिडको विभागीय कार्यालयापर्यंत येण्यासाठी खासगी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती, ठिकठिकाणी फलक लावण्यात आले होते. मोर्चादरम्यान सातत्याने घोषणा देण्यात येत होत्या. त्यामुळे काही काळ सिडको परिसरात वाहतूक कोंडी झाली. आंदोलनात बाळकृष्ण शिरसाठ यांच्यासह माजी नगरसेविका पुष्पा आव्हाड, भगवान दोंदे, ॲड. शाम बडोदे, साहेबराव आव्हाड आदी उपस्थित होते. महिलांनी आपली व्यथा मांडताना प्रशासनाच्या उदासीनतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्हाला दररोज पाण्यामुळे खोळंबा होतो. पाणी नसल्याने टँकर मागवावा लागतो. लहान मुले, रुग्ण, वृद्ध यांना यामुळे खूप त्रास होतो. रस्ते खराब आहेत, पथदिवे नसल्याने महिलांना सुरक्षित वाटत नाही, असा तक्रारींचा पाऊस आंदोलकांनी पाडला. आंदोलकांनी विभागीय अधिकाऱ्यांना घेराव घातला. या संदर्भात योग्य उपाययोजना न झाल्यास यापुढे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रहिवाशांनी दिला.

प्रभाग क्रमांक ३१ मधील नागरी समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पाणीटंचाईमुळे रहिवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्यांची स्थिती दयनीय आहे. पथदीप तसेच दुभाजकांअभावी अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याने मोर्चाच्या माध्यमातून आवाज उठवला. – बाळकृष्ण शिरसाठ ( मोर्चेकऱ्यांचे प्रमुख)