भाजपमधील स्थानिक पातळीवरील सुंदोपसुंदीचे पडसाद शनिवारी या पक्षाच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमातही उमटल्याचे पाहावयास मिळाले. ध्रुवनगर येथे विकासकामांचे उद्घाटन राज्याच्या महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे आणि कामगारमंत्री प्रकाश मेहता यांच्या हस्ते झाले. भाजप नगरसेवकाने आयोजिलेल्या या कार्यक्रमावर पक्षाच्याच आमदार सीमा हिरे यांनी अनुपस्थित राहत अप्रत्यक्षपणे बहिष्कार टाकला.
बारदान फाटा ते अमृत गार्डन या रस्त्याचे विश्वात्मक जंगलीदास महाराज असे नामकरण, ध्रुवनगर येथील जलकुंभाचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे असे नामकरण आणि लोकार्पण सोहळा यांसह विविध विकासकामांच्या उद्घाटन उपरोक्त मंत्र्यांसह भाजपचे आ. देवयानी फरांदे व बाळासाहेब सानप यांच्या उपस्थितीत झाले. या सोहळ्यासाठी प्रभाग क्रमांक १७चे पक्षाचे नगरसेवक दिनकर पाटील यांनी जय्यत तयारी केली. भाजपचे सर्व पदाधिकारी झाडून कार्यक्रमास उपस्थित असताना नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पक्षाच्या आमदार हिरे मात्र अनुपस्थितीत होत्या. त्यामागे काही महिन्यांपूर्वी संबंधित नगरसेवक आणि आमदार यांच्यातील वाद कारक ठरल्याचे सांगितले जाते. काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेल्या या नगरसेवकाने आमदाराच्या पती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तेव्हापासून उभयंतांमध्ये सुरू असलेल्या वादाचे प्रतिबिंब या कार्यक्रमात उमटले. सोहळ्यात याबद्दल जाहीर वाच्यता झाली नसली तरी ही बाब अनेकांच्या लक्षात आली. दरम्यान, जलकुंभाच्या नामकरणाचा संदर्भ घेऊन पंकजा मुंडे यांनी आपण वडिलांच्या स्मरणार्थ गोपीनाथ गड या भव्य स्मारकाची उभारणी केल्याचे नमूद केले. राजकारणात मोठे नेता होणे म्हणजे खुर्चीवर बसणे नाही. लोकांमध्ये मिसळून अधिकाधिक काम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. मेहेता यांनी शिक्षण आणि राजकारण यांचा कोणताही संबंध नसून जे लोकांमध्ये राहून कार्यप्रवण असतात ते लोकनेते होतात, असे अधोरेखित केले.

Story img Loader