जळगाव : राज्यात पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीबरोबर हिंदी शिकण्याच्या अनिवार्यतेवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर मनसे, शिवसेना (उध्दव ठाकरे), काँग्रेस यांच्यासह इतर काही पक्षांनी टीका केली असताना भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचा दावा केला आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्यामुळे प्रत्येक भारतीयाने ती शिकलीच पाहिजे, असे मत व्यक्त केले.

येथे पत्रकारांशी मंत्री महाजन यांनी संवाद साधला. मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे मत वेगळे असू शकते. परंतु, हिंदी भाषा ही प्रत्येक भारतीयाने शिकली पाहिजे. ती संवादासाठी, राष्ट्राच्या एकतेसाठी आणि विविधतेतील ऐक्य जपण्यासाठी महत्त्वाची भाषा आहे. ज्या देशात आपण राहतो, त्या देशाची राष्ट्रभाषा हिंदी आहे. त्यामुळे ती येणे आपल्याला गरजेचे आहे. महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठीच आहे आणि तिचे स्थान अढळ राहणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनावर विरोधकांकडून टीका होत असताना मंत्री महाजन यांनी सरकारची बाजू घेत आर्थिक व्यवस्थापन चांगल्या स्थितीत असल्याचा दावा केला. राज्य सरकारचे आर्थिक नियोजन बिघडल्याचे अजिबात वाटत नाही. राज्याची आर्थिक स्थिती सध्या चांगली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला काहीसा निधी मागे-पुढे झाला असला, तरी इतर अनेक खात्यांमध्ये योग्य नियोजन सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी मिळून मागील सर्व अनुशेष भरून काढला आहे. त्यामुळे विकासकामांमध्ये कोणतीही अडचण येणार नाही, असे देखील महाजन यांनी नमूद केले. बाळासाहेब ठाकरे यांचे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाद्वारे सादर केलेले भाषण म्हणजे उद्धव ठाकरे गटाने सहानुभूती मिळवण्यासाठी केलेला प्रयोग आहे. उद्धव ठाकरे यांचा टीआरपी आता संपलेला आहे. त्यांच्याबरोबर कोणी उरलेले नाही. त्यामुळेच ते अशा प्रकारचे केविलवाणे प्रयोग करत आहेत, अशीही टीका महाजन यांनी केली.