भारतीय जनता पार्टीच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी आपली थोरली बहीण व भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. “सगळे घाव झेलायला ताई (पंकजा मुंडे) आहे आणि मलाई खायला मी आहे,” असं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं. त्या नाशिक येथे विद्यार्थ्यांना संबोधित करत होत्या.
यावेळी प्रीतम मुंडे म्हणाल्या, “आज ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ हा भारतीय जनता पार्टीचा नारा आहे. पण हा नारा प्रत्यक्षपणे ४० वर्षे ज्यांनी आपल्या राजकीय आयुष्यात एक व्यक्ती जगली. ती व्यक्ती म्हणजे गोपीनाथ मुंडे आहेत. माझा जन्म त्यांच्या घरी झाला, त्यामुळे माझ्याइतकं भाग्यवान कुणी नाही, असं मला वाटतं. त्यापेक्षा माझं मोठं भाग्य म्हणजे माझा जन्म पंकजाताईंच्या पाठीवर झाला. कारण सगळे घाव झेलायला ताई आहे आणि त्याची सगळी मलाई खायला मी आहे,” असं विधान प्रीतम मुंडे यांनी केलं.
हेही वाचा- ‘स्वाभिमान गहाण ठेवणार नाही’
प्रीतम मुंडे आपल्या भाषणात पुढे म्हणाल्या, “समोर बसलेले विद्यार्थी म्हणत असतील की, हे तुम्ही काय सांगत आहात. आयुष्यात संघर्ष करा, कष्ट करा, हे गोपीनाथ मुंडेंच्या घरी जन्मलेल्या मुलींनी व्यासपीठावर बसून सांगू नये, असं काहींना वाटत असेल. पण माझा येथे बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्न आहे. ठीक आहे… आम्ही नशिबवान आहोत. कारण माझा किंवा राहुल कराडचा आमच्या घरी जन्म झाला. पण गोपीनाथ मुंडे कुठल्या मोठ्या माणसाच्या घरी जन्मले नव्हते किंवा विश्वनाथ कराड कुठल्या दिग्गज माणसाच्या घरी जन्मले नव्हते.”
हेही वाचा- भाजप नेत्यांच्या खेळीने मुंडे भगिनी अस्वस्थ
“त्यामुळे तुम्हाला राहुल कराड व्हायचंय की विश्वनाथ कराड व्हायचंय हा तुमचा निर्णय आहे. तुम्हाला प्रीतम मुंडे व्हायचंय की गोपीनाथ मुंडे व्हायचंय हा तुमचा निर्णय आहे. तुम्ही ठरवलं तर तुम्ही गोपीनाथ मुंडे किंवा विश्वनाथ कराड का होऊ शकत नाही? ही जिद्द मनाशी बाळगा आणि तुमच्या ध्येयाकडे वाटचाल करा, असं केलंत तर तुम्ही निश्चित यशस्वी व्हाल,” असंही प्रीतम मुंडे म्हणाल्या.