धुळे : दिवसाआड पिण्याचे पाणी देण्याचे आश्वासन दिलेले असताना पाण्यासाठी धुळेकरांचे होणारे हाल पाहून येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी बीजेपी क्या हुआ तेरा वादा ?, सत्ता तुमची, हाल जनतेचे, पाणी द्या नाहीतर राजीनामा द्या, अशा आशयाचे फलक महानगर पालिकेसमोर लावले. २० जूनपर्यंत दिवसाआड पाणी न दिल्यास महापालिकेला हंड्यांचे तोरण बांधण्याचा इशारा दिला. संतप्त भाजपने रात्रीतून फलक हटविला. पाणी न दिल्यास शहरभर फलक लावून भाजपचा खरा चेहरा समोर आणू, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आनंद लोढे, किरण गायकवाड, शंकर खरात यांनी दिला आहे.
सध्या धुळ्यात १२ ते १५ दिवसाआड नळांना पाणी येत आहे. महापालिका निवडणुकीवेळी मंत्री गिरीश महाजन, खासदार डॉ. सुभाष भामरे, भाजप जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी दिवसाआड पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले. हाच धागा पकडत शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळ मोठा फलक लावला. त्यावर मंत्री महाजन, खासदार डॉ. भामरे, जिल्हाध्यक्ष अग्रवाल यांचे छायाचित्र लावून त्याखाली ‘बीजेपी क्या हुआ तेरा वादा?‘, ‘एक दिवसाआड नियमित पाणी द्या, नाहीतर राजीनामा द्या!‘, ‘धुळे जिल्हा पाणी प्रश्न विसरलात का?‘, ‘धुळेकर जनतेने पाण्यासाठी किती हाल सोसावे?‘,‘सत्ता तुमची, हाल जनतेचे…‘ असे प्रश्न विचारण्यात आले. त्यावर पाणी स्टोरी असेही लिहिण्यात आले होते. ही माहिती भाजप पदाधिकार्यांना समजल्यानंतर त्यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला सांगून फलक हटविला.