लोकसत्ता वार्ताहर
मालेगाव : शनिवारी मालेगाव दौऱ्यावर आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांच्या घरी भेट दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजप प्रदेशाध्यक्षांची स्वारी काँग्रेस जिल्हाध्यक्षांच्या घरी जाण्याचा हा प्रकार राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. त्याचाच भाग म्हणून धुळे लोकसभा मतदार संघातील बागलाण, मालेगाव मध्य आणि मालेगाव बाह्य या तीन विधानसभा मतदार संघातील प्रभावशाली कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी ते येथे आले होते. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी केंद्रस्तरापर्यंत जाऊन काय काळजी घ्यावी, याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी,खासदार डॉ. सुभाष भामरे, ज्येष्ठ नेते सुरेश निकम, डॉ. प्रताप दिघावकर, जिल्हाध्यक्ष नीलेश कचवे, देवा पाटील आदी उपस्थित होते.
आणखी वाचा-संजय राऊत यांच्याकडून सर्व पक्षांचे वाटोळे, खासदार हेमंत गोडसे यांची टीका
संवादाचा कार्यक्रम झाल्यावर बावनकुळे यांचा ताफा धुळ्याकडे मार्गस्थ झाला. वाटेत अचानक हा ताफा काँग्रेसचे नाशिक जिल्हाध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांच्या घरी पोहचला. घरी आलेल्या बावनकुळे यांचा शेवाळे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. जवळपास २० मिनिटे बावनकुळे हे शेवाळे यांच्या घरी थांबले होते. भेटीत बावनकुळे यांच्यासोबत विजय चौधरी, डॉ. दिघावकर यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप प्रदेशाध्यक्षांनी अचानक काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांच्या घरी जाण्याच्या या प्रकारामुळे खुद्द भाजपचे काही पदाधिकारीच अचंबित झाले. हा रागरंग बघत चर्चेच्या ओघात या भेटीमागील कारण बावनकुळे यांनीच उघड केले. आपला मुलगा आणि आणि शेवाळे यांचा मुलगा हे दोघे वर्गमित्र असल्याने शेवाळे यांच्या मुलाच्या आग्रहामुळेच आपण त्यांच्या घरी चहापानासाठी आल्याचे त्यांनी नमूद केले. बावनकुळे यांनी सांगितलेले या भेटीमागील हेच कारण खरे असेल हे मान्य करणे जरा अवघड असल्याने या भेटीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे.