सलग साडेचार वर्षे परस्परांवर आगपाखड करणारे शिवसेना-भाजप हे पक्ष लोकसभा निवडणुकीसाठी एकत्र आले. आता निवडणुकीनंतर महापालिकेत एकहाती सत्ता मिळविणारा भाजप आणि विरोधी पक्षात असलेली शिवसेना स्थानिक पातळीवर परस्परांविरोधात शड्डू ठोकतील की हातमिळवणी करतील? याकडे सर्वाचे लक्ष आहे.
उभय पक्षांच्या बदललेल्या भूमिकांमुळे स्थानिक पातळीवरील राजकारण वेगळ्या वळणावर आले आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिका निवडणुकीत भाजप, शिवसेना स्वतंत्रपणे लढले होते. भाजपने एकहाती सत्ता प्राप्त केली. जनतेचा कौल मान्य करत शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत उभी ठाकली. महापालिकेत भाजपचे ६५, शिवसेनेचे ३५, मनसे आणि राष्ट्रवादी प्रत्येकी सहा, काँग्रेसचे पाच, रिपाइंचे एक आणि अपक्ष तीन नगरसेवक आहेत. शिवसेनेने सर्व विरोधी पक्षांची मोट बांधून जनहित विरोधात वाटणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या अनेक निर्णयांना कडाडून विरोध केला होता. मालमत्ता करवाढ, शेतीवरील कर, अंगणवाडी बंद करणे आदी प्रश्नांवर भाजपशी दोन हात करणाऱ्या शिवसेनेने काही विषयांत मात्र सत्ताधाऱ्यांना सहकार्य केल्याचा ताजा इतिहास आहे.
दोन्ही पक्ष लोकसभा निवडणुकीत अकस्मात एकत्र येतील, याची स्थानिकांना कल्पना नव्हती. यामुळे स्थायी समितीमध्ये भाजपचे संख्याबळ कमी झाल्याची तक्रार करत शिवसेनेने उच्च न्यायालयात दाद मागितली होती. नंतर हा विषय विभागीय आयुक्त आणि पुन्हा महापालिकेकडे आला. सर्वसाधारण सभेत त्यावर निर्णय होईल. आचारसंहितेमुळे तो पुढे सरकलेला नाही.
लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवाराच्या प्रचारात भाजपचे तिन्ही आमदार आणि सर्व नगरसेवक हिरिरीने सहभागी झाले होते. लोकसभेत एकत्रित राहिलेले दोन्ही पक्षांचे स्थानिक पदाधिकारी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पालिकेतील समीकरणे सोडवतील, असा अंदाज आहे. त्यामुळे पालिकेतील विरोधी पक्षाचा आवाज मात्र होणार आहे.
लोकसभेचा निकाल काय लागेल, यावर भाजप शिवसेनेला किती महत्त्व देईल हे अवलंबून आहे. महापालिकेत भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. यामुळे शिवसेनेला ते कितपत संधी देतील, हा प्रश्न आहे. विधानसभा निवडणूक होईपर्यंत सेना-भाजप स्थानिक पातळीवर भांडणार नाही. पण, तोवर महापौर, उपमहापौर, स्थायी सभापती निवडणुका होणार आहेत. त्यात शिवसेनेला काहीतरी भूमिका घ्यावी लागेल. पालिकेतील विषय जनतेशी संबंधित असतात. शिवसेना सत्तेत सहभागी झाली तरी त्यांना भांडावेच लागेल. सत्ताधाऱ्यांच्या चुकीच्या निर्णयाविरोधात आमची लढाई सुरूच राहील. – गुरुमित बग्गा (ज्येष्ठ नगरसेवक)
आगामी विधानसभा निवडणुकीत युती करायची असेल तर महापालिकेसह जिल्हा परिषदेतही युती करावी लागेल. दोन्ही पक्षांना सर्व स्तरावर युतीचा विचार करावा लागेल. शिवसेनेची नाशिककरांशी नाळ जोडलेली आहे. यामुळे शिवसेना सत्तेत असो वा नसो, जिथे अन्याय झाल्याचे जाणवेल, तिथे शिवसेनेचा विरोधी आवाज असेल. -अजय बोरस्ते (विरोधी पक्षनेते, महापालिका)