नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपाकडून इच्छुक असलेले उमेदवार धनंजय जाधव यांनी सोमवारी (१६ जानेवारी) आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. धनंजय जाधव हे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात. उमेदवारी अर्ज का मागे घेतला यावर बोलताना धनंजय जाधव यांनी भाजपाचे नेते गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे आणि खासदार सुजय विखे यांच्या नावाचा उल्लेख केला. तसेच पक्षश्रेष्ठींकडून देण्यात आलेल्या आदेशाचे पालन म्हणून माघार घेतल्याचे नमूद केले.
धनंजय जाधव म्हणाले, “माझी आमचे पक्षश्रेष्ठी गिरीश महाजन, नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यांच्या सूचनेनुसारच मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेत आहे. उमेदवार कोण असणार हे पक्षश्रेष्ठी ठरवतील. आम्ही नगर जिल्ह्यात काम करताना राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार सुजय विखे यांच्या नेतृत्वात काम करतो. त्यांनी हा निर्णय घेतला असेल, तर तो निश्चितच पक्षाच्या हिताचा आहे असं मी मानतो. मी राधाकृष्ण विखे आणि सुजय विखे यांना मानणारा कार्यकर्ता आहे. त्यांच्या सूचनेनुसार मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.”
“पक्षाला माझ्यापेक्षा एखाद्या दुसऱ्या उमेदवाराचा फायदा होत असेल, तर…”
“कोणाला उमेदवारी द्यायची हे पक्ष ठरवत असतो. तो पक्षाचा सर्वस्वी निर्णय असतो. पक्षाला माझ्यापेक्षा एखाद्या दुसऱ्या उमेदवाराचा फायदा होत असेल, त्या उमेदवाराची जिंकून येण्याची शक्यता असेल आणि पक्ष त्या उमेदवाराला संधी देत असेल तर ती चांगली गोष्ट आहे,” असं सूचक विधान धनंजय जाधव यांनी केलं.
“भाजपा कोणाला पाठिंबा देणार?”
भाजपा कोणाला पाठिंबा देणार? या पत्रकारांच्या प्रश्नावर धनंजय जाधव म्हणाले, “आम्हाला अद्याप तशा कोणत्याही सूचना केलेल्या नाहीत. परंतु, लवकरच पक्षश्रेष्ठी ठरवतील. पक्ष एका चांगल्या उमेदवाराला पाठिंबा देईल. आम्ही सर्वजण मिळून त्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू.”
हेही वाचा : तांबे पिता-पुत्राच्या बंडानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण? नाना पटोले म्हणाले, “बेईमानी करून…”
“भाजपा अपक्षाला मदत करत आहे, त्यांच्याकडे चांगला उमेदवार नव्हता का?”
भाजपा अपक्षाला मदत करत आहे, त्यांच्याकडे चांगला उमेदवार नव्हता का? या प्रश्नावर धनंजय जाधव म्हणाले, “भाजपाकडे चांगले उमेदवार होते आणि आहेत. मात्र, आणखी चांगले उमेदवार पक्षाकडे येणार असतील आणि त्यामुळे पक्षाची ताकद वाढणार असेल, तर तो निर्णय पक्षाचा आहे.”