तीन जण ताब्यात, सात फरार
बागलाण तालुक्यातील मळगाव भामेर येथील पोहाणे शिवारात सोमवारी पहाटेच्या सुमारास १० जणांच्या टोळीने काळविटाची शिकार केल्याचे उघडकीस आले. हे शिकारी वर्षभरापासून पाळत ठेवून होते. वन विभागाने ग्रामस्थांच्या मदतीने सापळा रचत तिघांना अटक केली, तर सात जण दुचाकी सोडून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले.
वर्षभरापासून मळगाव ते पोहाणे या रस्त्याचे काम सुरू आहे. या ठिकाणी गुजरातमधील काही मजूर कामावर असून रस्त्यालगतच्या अवैध गावठी दारूच्या अड्डय़ावर ते मद्यपान करीत असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली होती. त्यांनी या मजुरांवर पाळत ठेवली. त्याच अंतर्गत रविवारी रात्री जिभाऊ अहिरे (६०) यांच्या दारूच्या अड्डय़ावर ग्रामस्थांना अनोळखी पाच दुचाकी आढळून आल्याने त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला. त्याचवेळी ग्रामस्थांनी पाचही दुचाकी ट्रॅक्टर ट्रॉलीत जमा केल्या. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांसह ग्रामस्थांनी अहिरे यांच्या घराची झडती घेतली. असता त्यांना तीन वर्षांच्या काळविटाची शिकार केल्याचे आढळून आले. शिकारी पुन्हा दोन कुत्र्यांसह हरणाची शिकार करण्यासाठी डोंगरावर चढले असल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.
ग्रामस्थांनी संशयितांचा पाठलाग करून तिघांना पकडले. अंधाराचा फायदा घेऊन सात संशयित पळून जाण्यात यशस्वी झाले. तिन्ही संशयितांना चोप देत ग्रामस्थांनी पाच दुचाकी, कोयता, हरीण शिजविण्याच्या साहित्यासह वन विभागाच्या स्वाधीन केले. या प्रकरणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जिभाऊ अहिरे (६०, अंबासन, ता. बागलाण), शैलेश बागूल (२२) आणि तुळशीराम पवार (३०, दोघेही गुजरात) यांना अटक केली. परवेश चौधरी, सुरेश वारळी, पिंटय़ा वारळी, धर्मेश आडगू, शिवमन वारळी, ईश्वर गावित, अश्विन गावित (सर्व राहणार करंजटी, डांग, गुजरात) हे सर्व फरार आहेत.
परिसरात मोठय़ा प्रमाणात वनसंपदा असून जंगलात मोरांसह जंगली श्वापदांचा नेहमीच वावर असतो. त्यात दुष्काळाची वन्यप्राण्यांना झळ बसत असून वन्यजीव पाण्याच्या शोधार्थ नागरी वस्तीकडे वावरू लागले आहेत. याचाच फायदा घेऊन शिकारी आपला कार्यभार साधत असल्याचे उघड झाले आहे. परिसरात २० ते २५ हरणांच्या कळपाचा नियमित वावर आहे. मात्र दिवसेंदिवस त्यांची संख्या कमी होत असल्याचे बोलले जात आहे.