सरकारी निकष, संबंधित संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव
शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून वंचित असलेले बहुविकलांग, सेरेबल पल्सी, पोलिओ, कर्णबधिर, अंध, अपंग यासह विविध आजारांनी त्रस्त असलेल्या बालकांसाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून विशेष प्रयत्न होत आहे. अध्ययन प्रक्रियेत अडचणी येऊ नये यासाठी अभियानाच्या माध्यमातून त्यांना शैक्षणिक साहित्यही वितरित केले जाते. मात्र या प्रयत्नांना सरकारी निकष आणि संबंधित संस्था यातील असमन्वयाचा फटका बसला आहे. परिणामी, शैक्षणिक वर्षांचे दुसरे सत्र सुरू होऊनही उपरोक्त विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्य अद्याप पोहचलेले नाही.
राज्य तसेच केंद्र सरकार विद्यार्थ्यांना किमान आठवीपर्यंतचे शिक्षण मिळावे, यासाठी सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून प्रयत्नशील आहे. या प्रक्रियेत अंध, अपंग, बहुविकलांग, अंशत अंध, सेरेबल पल्सी, स्वमग्न, कर्णबधीर अशा विविध व्याधींनी त्रस्त बालकांच्या शिक्षण हक्काचा गांभीर्याने विचार करण्यात आला आहे. त्यांच्यासाठी अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. नाशिक शहराचा विचार केला तर प्राथमिक विभागात व्याधींनी त्रस्त बालकांची संख्या १८२० असून माध्यमिक शाळा (अनुदानित) मध्ये ती २०३ आहे. जे सेरेबल पल्सी व बहुविकलांग गटात येतात, ज्यांना शाळेत येणे शक्य नाही, अशा विशेष दक्षता आवश्यक असलेल्या बालकांना ‘फिरते शिक्षक’ची (मोबाइल टीचर) सुविधा पुरविण्यात आली आहे. शहरात सध्या १०० हून अधिक विशेष बालकांसाठी १३ शिक्षक आठवडय़ातील ठरावीक दिवशी दोन तास गणित, इंग्रजी, भाषा विषयाचे प्राथमिक शिक्षण देऊन त्यांच्या शृजनतेला वाव देण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, या विद्यार्थ्यांना अध्ययनात अडचणी येऊ नये, यासाठी शिक्षण विभागाकडून त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्यासह कॅलिपर्स, व्हीलचेअर, केन, चष्मे यासह अन्य साहित्य उपलब्ध करून दिले जाते.
त्याकरिता शाळा सुरू झाल्यावर पहिल्या दोन महिन्यांत शिबीर घेऊन विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली जाते. त्यांच्या व्यंगाची नोंद घेत, त्यांना साहित्य दिले जाते. मात्र साहित्य वाटपात सावळा गोंधळ असून शिक्षण विभाग ही प्रक्रिया थेट राबवत नाही. केंद्र सरकारने स्वीकृती दिलेल्या संस्थेच्या माध्यमातून राज्य सरकारचा शिक्षण विभाग हे काम पाहते. या प्रक्रियेत बराचसा वेळ खर्ची पडतो आणि विद्यार्थ्यांना साहित्य शैक्षणिक वर्ष संपत असताना हाती पडते, हा आजवरचा अनुभव यंदाही कायम आहे. मागील वर्षी शिबिराच्या माध्यमातून नोंद घेतलेल्या विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षांच्या सुरुवातीला साहित्य वाटप करण्यात आले. यंदा जुलै महिन्यात शिबीर घेण्यात आले. मात्र दुसरे सुत्र सुरू होऊनही विद्यार्थ्यांना साहित्या विना अध्ययन अशी ‘शिक्षा’ भोगावी लागत आहे. या संदर्भात सर्वशिक्षा अभियानातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी अपंगाना साहित्य पुरविणारी संस्था जबलपूर येथील असल्याचे नमूद केले. संस्थेचे पथक शिबिराच्या माध्यमातून मुलांची तपासणी करतात. ही सगळी माहिती संस्थेकडे सादर केल्यावर विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार साहित्य त्या त्या आकारात बनविण्यास सुरुवात होते.
दुसरीकडे त्या त्या शाळांकडून या सर्व माहितीची खातरजमा केली जाते. यात कालपव्यय होत असल्याने विद्यार्थ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत असल्याचे संबंधित अधिकाऱ्याने मान्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा