अंधांसाठी २० डिसेंबर रोजी येथे नाशिक राऊंड टेबल १०७, नाशिक लेडीज सर्कल, ब्लाइंड वेल्फेअर असोसिएशन आणि वेस्टर्न इंडिया स्पोर्टस असोसिएशन यांच्या वतीने कार रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
सामाजिक कार्यात अग्रेसर असलेली नाशिक राऊंड टेबल १०७ आणि त्यांची सहयोगी नाशिक लेडीज सर्कल या संस्थांच्या वतीने नाशिकजवळील आशेवाडी येथे शाळा बांधण्यात येत आहे. या सामाजिक उपक्रमाचा एक भाग म्हणून अंधांसाठी वेस्टर्न इंडिया स्पोर्टस असोसिएशनच्या सहकार्याने कार रॅली आयोजित करण्यात आली आहे. सिटी सेंटर मॉलपासून सकाळी आठ वाजता स्पर्धेला सुरूवात होईल. स्पर्धेत डोळस चालक हा दृष्टिहीन साथीदार ज्याप्रमाणे मार्गदर्शन करेल त्याप्रमाणे कार चालवेल. त्यासाठी दृष्टिहीन साथीदाराकडे ब्रेल लिपीतील रस्त्याचा नकाशा देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये कोणीही एका दृष्टिहीन साथीदारासह सामील होऊ शकतात. साधारणपणे ७० किलोमीटरचा मार्ग असणार आहे. मार्गात वेगवेगळ्या ठिकाणी विसाचे मार्गदर्शक उभे असतील. या स्पर्धेतून मिळणारा सर्व निधी आशेवाडी येथील शाळेच्या बांधकामासाठी वापरण्यात येणार आहे. १५ वर्ष मोटार स्पोर्टस क्षेत्रामध्ये कार्यरत असलेली विसा ही संघटना स्पर्धा आयोजनाबरोबरच वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमामध्येही सहभागी असते. म्हणूनच चार वर्षांपासून नाशिक राऊंड टेबल या संस्थेबरोबर विसा अंधांसाठीच्या या स्पर्धेचे आयोजन करत आहे. स्पर्धेत ७५ स्पर्धक सामील होण्याची आशा आयोजकांना आहे. स्पर्धेतील विजेत्यांना चषकासह यंदा प्रथमच पाच हजार, तीन हजार, दोन हजार रूपये असे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. नाशिक शहर आणि परिसरात ही स्पर्धा होणार असून १९ डिसेंबपर्यंत नाव नोंदणी करता येईल. अधिक माहितीसाठी ९३७३९०४७५९, ८८८८८८१३१३ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेस अजिताभ अग्रवाल, स्नेहा जोहरी, आकाश अग्रवाल, विसाच्या स्वाती पंडित आदी उपस्थित होते.

Story img Loader