मालेगाव : बकरी ईदनिमित्त कुर्बानी देताना जनावरांची कत्तल उघड्यावर न करता अधिकृत कत्तलखान्यांमध्येच करावी अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस आणि महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आला होता. मात्र या इशाऱ्याला न जुमानता येथे काही ठिकाणी जनावरांची उघड्यावर कत्तल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उघड्यावर झालेल्या कत्तलीमुळे रक्तमिश्रित पाणी गटारांद्वारे मोसम नदीपात्रात आल्याने संतप्त झालेल्या सार्वजनिक नागरी सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी धरणे आंदोलन करत या प्रकाराचा धिक्कार केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जनावरांच्या कत्तलीनंतर रक्तमिश्रित पाणी गटारांद्वारे मोसम नदीपात्रात जाते. या नदीचे पाणी पुढे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गिरणा धरणात जाते. त्यामुळे या विरोधात येथील जागरुक नागरिकांतर्फे सातत्याने आंदोलने करण्यात येतात. ही समस्या महापालिका आणि पोलीस या दोघांच्या दृष्टीने मोठी डोकेदुखी ठरत असते. त्यावर अद्याप तरी ठोस उपाय योजना होऊ शकलेली नाही.

हेही वाचा – प्रस्तावित Rope Way चा विषय आता जिल्हाधिकाऱ्यांकडे; वनमंत्र्यांच्या भूमिकेविषयी पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजी

याप्रश्नी सातत्याने आवाज उठविणाऱ्या सार्वजनिक नागरी सुविधा समितीने महिन्यापूर्वी महापालिकेला एक निवेदन देऊन बकरी ईदच्या कुर्बानीनंतर रक्तमिश्रित पाणी मोसम नदीपात्रात येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी विनंती केली होती. त्याची दखल घेत बकरी ईदला होणाऱ्या जनावरांच्या कुर्बानीच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाने काही उपाययोजना हाती घेतल्या होत्या. शहरात पालिकेचा एक कत्तलखाना आहे. त्याव्यतिरिक्त १३ ठिकाणी तात्पुरते कत्तलखाने उभारण्यात आले. नेमून दिलेल्या अधिकृत ठिकाणीच जनावरांची कत्तल होईल, याविषयी महापालिका प्रशासनाने प्रयत्न केले. उघड्यावर कत्तल करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी तंबीदेखील देण्यात आली होती.

हेही वाचा – नाशिक : महसूल विभागातील लाचखोरी चर्चेत; डॉ. नीलेश अपार चौकशीचा तपास अकोल्यापर्यंत विस्तारणार

नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या अध्यक्षतेखाली येथे पार पडलेल्या शांतता समितीच्या बैठकीतही या विषयावर गंभीर चर्चा झाली. उघड्यावरील कत्तल आणि त्याद्वारे रक्तमिश्रित पाणी गटारांद्वारे नदीपात्रात येणे, हा गंभीर प्रकार असल्याने तो खपवून घेतला जाणार नाही, असा सूर बैठकीत व्यक्त केला गेला. प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या खबरदारीमुळे यंदा रक्तमिश्रित पाणी नदीपात्रात येण्याचे प्रमाण तुलनेने कमी झाले तरी ते पूर्णपणे थांबलेले नाही. जनावरांच्या कत्तलीनंतर रक्तमिश्रित पाणी पुन्हा मोसम नदीपात्रात आल्याचे दृश्य दिसून आले. बराच वेळ हे पाणी येत होते. या प्रकाराविरोधात सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे सांडवा पूल भागात काही काळ धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी समितीतर्फे आयुक्त भालचंद्र गोसावी यांना गुलाबपुष्प देत निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनात समितीचे अध्यक्ष रामदास बोरसे, उपाध्यक्ष भरत पाटील, शिवजयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष जितेंद्र पाटील, सुनील पाटील आदी सहभागी झाले होते.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood mixed water in the riverbed agitation in malegaon ssb