महसूल विभागाच्या पथकाने पकडलेले मालवाहू वाहने (डंपर) सोडविण्यासाठी दीड लाखाची लाच घेताना अमळनेर येथील तलाठ्यासह मंडळ अधिकार्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सापळा रचत रंगेहात अटक केली . अमळनेर शहरासह तालुक्यात तक्रारदारांचा बांधकाम साहित्य वितरणाचा (बिल्डिंग मटेरिअल सप्लायर्स) व्यवसाय आहे.
हेही वाचा : विश्लेषण : ‘आदिपुरुष’वर खरंच बंदी घातली जाऊ शकते का? सेन्सॉर बोर्डचे नियम जाणून घ्या
हेही वाचा : चीनला ‘जशास तसे’ उत्तर का नाही ?
त्यासाठी त्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचे तीन डंपर, तर करारनामा तत्त्वावर विकत घेतलेले तीन डंपर आहेत. पैकी करारनामा तत्त्वावरील डंपर अमळनेर शहरात माती वाहतूक करताना दोन महिन्यांपूर्वी अमळनेर येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले होते. डंपरवर कारवाई न करता सोडविण्याच्या मोबदल्यात तक्रारदारांकडे अमळनेर येथील शहर तलाठी गणेश महाजन (वय ४६, रा. नवीन बसस्थानकाजवळ, पाळधी, ता. धरणगाव, जि. जळगाव) आणि मंडळ अधिकारी दिनेश सोनवणे (वय ४८, रा. फरशी रोड, अमळनेर) यांनी दोन लाख रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती ही रक्कम दीड लाख ठरविण्यात आली.
हेही वाचा : नशिक : मुक्त विद्यापीठाचा केंद्रीय युवक महोत्सवामध्ये कोल्हापूर विभाग विजेता
यासंदर्भात तक्रारदाराने याबाबत जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, एन. एन. जाधव, सहाय्यक फौजदार दिनेशसिंग पाटील, सुरेश पाटील यांच्या पथकाने सापळा रचत गुरुवारी पंचांसमक्ष दीड लाख रुपये स्वीकारताना तलाठी महाजन व मंडळ अधिकारी सोनवणे यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी अमळनेर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास नागरिकांनी तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शशिकांत पाटील यांनी केले आहे.