लोकसत्ता वार्ताहर
धुळे: सातबारा उताऱ्यावरील चूकीने झालेली विहिरीची फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी मंडळ अधिकाऱ्याला अटक केली. शिरपूर तालुक्यातील वकवाड येथील तक्रारदाराच्या सातबारा उताऱ्यावर चुकून विहिरीची नोंद झाली होती.
तक्रारदाराला विहिरीचे अनुदान घेणेकामी सातबारा उताऱ्यावरील ही नोंद कमी करुन हवी होती. त्यासाठी तक्रारदाराने वकवाड येथील तलाठ्याकडे अर्ज केला. तलाठ्याने फेरफार नोंद घेत पुढील मंजुरीसाठी मंडळ अधिकारी अशोक गुजर यांच्याकडे ती नस्ती पाठविली. ही फेरफार नोंद मंजूर करण्यासाठी गुजरने तक्रारदाराकडे १५ हजार रुपयांची लाच मागितली.
हेही वाचा…उत्तर महाराष्ट्र तापले, जळगावात पारा ४४ अंशांवर
तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच देण्याचे ठरले. याबाबत तक्रारदाराने धुळे लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच देण्यासाठी गुजरने तक्रारदाला घरी बोलविले. त्यानुसार पथकाने गुजरला १० हजार रुपयांची लाच घेताना पकडले. गुजरविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.