धुळे – शेत जमिनीची वाटणी करून देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच स्विकारताना साक्री तालुक्यातील जैताणे येथील मंडळ अधिकारी विजय बावा हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.साक्री तालुक्यातील भामेर येथील शेत जमिनीची पत्नी आणि मुलांमध्ये वाटणी करून देण्यासाठी दाखल झालेल्या प्रकरणाच्या पूर्ततेसाठी विजय बावा याने पैशांची मागणी केली होती. या कामासाठी १८ हजार रुपयांची मागणी झाल्यावर संबंधितांनी आठ हजार रुपये दिले होते.
परंतु, अडीच महिने उलटूनही प्रकरण मार्गी लागले नाही म्हणून संबंधिताने बावाची भेट घेतली असता उर्वरित १० हजार रुपये आणून देण्याची मागणी बावाने केली. मेटाकुटीस आलेल्या संबंधितांनी धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीच्या अनुषंगाने पथकाने तक्रार नोंदवून घेत भामेर येथे सापळा रचला. बावा यास लाच स्विकारताना रंगेहात पकडले. त्याच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.