नाशिक – करोनाचे सावट गडद असताना दैनंदिन व्यवहार बंद असताना व्यापार, व्यवसाय यास अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने महाकार्गो ही वाहतूक सेवा सुरू करण्यात आली होती. राज्यस्तरावर या उपक्रमास आजही प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीत राज्य शिक्षण मंडळाच्या एससीआरटी विभागाच्या वतीने राज्याच्या विविध विभागांत पुस्तक वितरणाचे काम कार्गो सेवेमार्फत सुरू आहे.
राज्य परिवहन महामंडळाने करोना काळात महत्त्वाची भूमिका निभावली. प्रवासावर मर्यादा असताना व्यापार, व्यवसायासाठी अडचणी येत होत्या. या पार्श्वभूमीवर धान्य, सामान, औद्योगिक सामान ने-आण करण्यासाठी महाकार्गोची सेवा सुरू केली. सद्यस्थितीत राज्यात ८० हून अधिक बस या महाकार्गोच्या सेवेत आहेत. जिल्ह्यात १० हून अधिक कार्गो बस कार्यान्वित आहेत. प्रत्येक आगारात तशी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली.
हेही वाचा – धुळे जिल्ह्यात बनावट डॉक्टर शोधण्यासाठी मोहीम
सध्या राज्य शिक्षण मंडळाच्या एससीआरटीकडून राज्याच्या वेगवेगळ्या भागात पुस्तक वितरणाचे काम सुरू आहे. राज्याच्या ८० कार्गो बस यामध्ये सक्रिय आहेत. नाशिकच्या पाच कार्गो बस येथील बालभारती कार्यालयातून पुस्तक भरत असून वेगवेगळ्या केंद्रावर ती पुस्तके पोहोचवित आहेत. पुढील १५ दिवसांत हे काम पूर्ण होईल, अशी माहिती नाशिक विभागीय वाहतूक अधिकारी किरण भोसले यांनी दिली. तसेच, सध्या महाबीज, बिसलरी या कंपन्यांचा माल तसेच खताची ने-आण सुरू आहे. घोटीतून धान्याची वाहतूक २०० किलोमीटरच्या परिघात होत आहे. सिन्नर, दिंडोरी, अंबड, सातपूर औद्योगिक वसाहतीतील लघू उद्योगांकडून या सेवेचा लाभ घेतला जात आहे.