नाशिक स्थित यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या बीए दुसऱ्यावर्षाच्या इतिहासाच्या मराठी पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित दहशतवादी असा उल्लेख आहे. इतिहासाच्या या पुस्तकात स्वातंत्र्यवीर सावरकरांशी संबंधित जहालवादी, दहशतवादी असे शब्द वापरण्यात आले आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने यावर आक्षेप घेतल्यानंतर सावरकरांशी संबंधित असलेल्या भाग बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या स्वातंत्र्य लढयात महत्वपूर्ण योगदान देणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याशी संबंधित असलेल्या भागात सुधारणा करण्यात येणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
जहालवादी, दहशतवादी हे शब्द थेट स्वातंत्र्यवीर सावरकरांना उद्देशून वापरण्यात आलेले नाहीत. २००१ साली हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. मी ते अजून पाहिलेले नाही. फक्त मराठी माध्यमाच्या पुस्तकात हा उल्लेख आहे. आम्हाला अनावश्यक वाद निर्माण करायचा नाही. त्यामुळे हा उल्लेख वगळून आम्ही पुस्तकात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरु ई. वायूनंदन यांनी दिली.
७० वर्षांपूर्वी हे शब्द वापरले जायचे. आज हे शब्द तसेच ठेवणे चुकीचे आहे. आम्ही चूक मान्य करतो असे प्रादेशिक संचालक नारायण मेहरे म्हणाले. भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात लढणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांकडून युवा वर्ग प्रेरणा घेत असतो. ऐतिहासिक तथ्यांशी अशा प्रकारे मोडतोड करुन स्वातंत्र्य सैनिकांना दहशतवादी संबोधण अजिबात स्वीकार करणार नाही असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे वैभव बावनकर यांनी सांगितले.