नाशिक : गुजरातच्या सीमावर्ती भागातील गावांसारखा विकास न केल्यास सुरगाणा तालुक्यातील सीमेलगतची गावे गुजरातला जोडावीत, अशी मागणी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी केली होती. मात्र या मतदारसंघाचे आमदार आपल्याच पक्षाचे असल्याचे लक्षात घेऊन राष्ट्रवादीने सारवासारव केली असून गावित यांची ही मागणी व्यक्तीगत असून पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा… “शिंदे गटात लवकरच स्फोट होईल”, संजय राऊतांचं मोठं विधान; म्हणाले, “आमदार सोडून गेले म्हणून…”
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष गावित यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात या भागातील असुविधांवर प्रकाश टाकला होता. गावित यांनी सुरगाणा तालुक्यातील समस्यांविषयी तहसीलदारांशी चर्चा करताना अविकसित भाग गुजरातला जोडण्यात यावा, अशी भावनिक मागणी केल्याची माहिती मिळाली असल्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार यांनी म्हटले आहे. गावित यांनी केलेली मागणी त्यांची व्यक्तिगत असून महाराष्ट्र एकसंघ रहावा, अशीच राष्ट्रवादीची भूमिका आहे. कळवण- सुरगाणा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार नितीन पवार यांनी प्रस्तावित केलेल्या विविध विकास कामांना राज्य सरकारने स्थगिती दिली आहे. त्यामुळे या भागातील जनतेत सरकार विरोधात मोठा असंतोष निर्माण झालेला असल्याचेही ॲड. पगार यांनी नमूद केले आहे.