आर्थिक चणचण दूर करण्यासाठी पुतण्याने काकाच्या घरी दरोडय़ाचा कट रचल्याचा प्रकार पुढे आला आहे. काकाच्या घरातून लाखोंची रक्कम लुटण्यासाठी पुतण्याने मित्रांना सांगून दरोडा टाकण्याची योजना आखली. तथापि, बीट मार्शलच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी तिघा संशयितांना अटक केली आहे.

सावतानगर भागातील सवरेदय कॉलनीत राजकुमार बाफना कुटुंबासोबत हा प्रकार घडला. शासकीय कंत्राटदार असणारे बाफना मुंबई येथे असतात. त्यांचे कुटुंबीय या ठिकाणी वास्तव्यास आहे. बाफना यांचा पुतण्या पंकज बाफना (२३) हा सिडकोत वास्तव्यास आहे. कामधंदा नसल्याने आणि व्यसनामुळे डोक्यावर झालेले लाखो रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी त्याने हा कट रचला. काकाच्या घरात २० लाखांची रक्कम असल्याची कुणकुण लागल्यावर त्याने अक्षय देशमुख व राहुल चौधरी यांना ही माहिती देत दरोडय़ाची योजना आखली. गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास संशयितांनी बाफना यांच्या घरात शिरून लूट करण्याचा प्रयत्न केला. संशयितांनी राजकुमार बाफना कुठे आहेत, अशी विचारणा करत जितके पैसे असतील, तितके देण्याची मागणी केली. या वेळी बाफना यांच्या मुलीने दरवाजा लावून संशयितांना रोखण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या गोंधळाने संशयितांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अंबड पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकातील पोलीस कर्मचारी राजाराम गांगुर्डे व विष्णू गावित यांच्या निदर्शनास आला. दोन्ही बीट मार्शल यांनी संशयित अक्षय व राहुलला यांच्या मुसक्या बांधल्या. संशयितांना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर दरोडय़ाच्या कटाची माहिती उघड झाली. त्यानंतर पुतण्या पंकजलाही अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त डॉ. श्रीकांत धिवरे यांनी याबाबत माहिती दिली.

Story img Loader