नाशिक- ब्रम्हगिरी, गंगाद्वारसाठी रज्जूमार्ग (रोपवे) करावा, गंगा गोदावरीचे मूळ उगमस्थान असलेल्या ब्रह्मगिरी, गंगाद्वार आणि नीलपर्वतावर सिंहस्थ कालावधीत होणारी गर्दी लक्षात घेता कुठलीही आपतकालीन परिस्थिती उद्भवू नये यासाठी पायऱ्यांची दुरूस्ती करुन योग्य पर्यायी मार्गाची व्यवस्था करावी, मंदिरांची दुरुस्ती करतांना त्यांचा पुरातत्वीय बाज जपला जावा, यासह इतर मागण्या त्र्यंबकेश्वर सिंहस्थ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आल्या.
त्र्यंबक नगरपालिकेवर प्रशासक नेमल्यामुळे त्र्यंबकच्या विकासाला गती नाही. प्रशासकीय राजवटीत शहराचा विकास खुंटला असताना त्र्यंबकमधील नागरिकांनी एकत्र येत आगामी सिंहस्थ कुंभमेळा सुखरूप पार पडावा, यासाठी त्र्यंबकेश्वर सिंहस्थ नागरिक संघाची स्थापना केली आहे. या संघातर्फे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात संघातर्फे विविध मागण्या मांडण्यात आल्या. सर्वसोयीसुविधांसह स्वतंत्र पालखी मार्ग करून त्र्यंबकेश्वर आणि नाशिक कुंभ मार्गिका करावी, जमीन अधिग्रहणाचा मुद्दा योग्य पध्दतीने हाताळावा, कुंभमेळ्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता नाशिक आणि त्र्यंबक रस्त्यावर अवलंबून न राहता कावनई, सातुर्लीकडून येणारा रस्ता विस्तारित करावा, या ठिकाणी पर्यटक आणि भाविकांसाठी आवश्यक सुविधा निर्माण कराव्यात, भाविकांसाठी बस स्थानक, मंदिर परिसर, कुशावर्त यासह ठिकठिकाणी मार्गदर्शक फलक लावण्यात यावेत, गोदावरी पात्र विकसित करतांना त्याचा निश्चित आराखडा तयार करावा, कोणतेही विकास काम करतांना १०० वर्षांपेक्षा अधिक जुन्या वास्तु, वाडे , सुरक्षित ठेवावेत, भाजी बाजार व आठवडे बाजाराची योग्य व्यवस्था करावी, सिंहस्थ पर्वकालात त्र्यंबकेश्वरमध्ये नेहमी येणाऱ्या भाविकांसाठी धर्मकार्यातील गरज लक्षात घेता एखादी जागा कायमस्वरूपी आरक्षित करण्यात यावी, कुशावर्त आणि मंदिर ही मुख्य श्रध्दास्थाने असल्याने त्यातील मार्ग हा वारसा मार्गिका म्हणून घोषित करुन त्यासाठी त्या मार्गावरील काँक्रिट काढून रस्त्याची पूर्वीची पातळी ठेवावी, समतल रस्ता करावा, रस्त्याच्या मध्ये पाणी प्रवाहित राहण्यासाठी व्यवस्था करावी, लक्ष्मीनारायण चौकातील ऋणमुक्तेश्वर मंदिर ते गायत्री मंदिर या मार्गातील नदीवर असलेले काँक्रिट काढावे, चौकात सुशोभिकरण करावे, आखाड्यांना आवश्यक सोयी सुविधा देण्यात याव्यात, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
२०२७ मध्ये नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वरमधील नागरिकांनी एकत्र येत त्र्यंबकेश्वर सिंहस्थ नागरिक संघ स्थापन केला आहे. या संघातर्फे कुंभमेळ्याच्या अनुषंगाने प्रशासनाला विविध सूचना केल्या आहेत. कोणती कामे आवश्यक आहेत, कुठे कुठे काम करण्याची गरज आहे, ते निवेदनाव्दारे मांडले आहे.