नाशिक : लघु-मध्यम उद्योग क्षेत्रासमोरील आव्हाने, समस्या आणि उपाय यावर मंथन करण्यासाठी नाशिक येथे आज, गुरुवारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रस्तुत ‘लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह २०२३’चे आयोजन करण्यात आले आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या परिषदेत मऔविमचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उद्योग सहसंचालक (नाशिक विभाग) शैलेश राजपूत यांच्यासह नाशिक, जळगाव, धुळे येथील उद्योग क्षेत्रातील नामांकित उद्योजक सहभागी होतील. नाशिकमध्ये मोठा उद्योग येण्याची आवश्यकता औद्योगिक संघटनांकडून नेहमीच मांडली जाते. वाहन व विद्युतशी संबंधित समूह (क्लस्टर) तयार झाल्यास विकासाला गती मिळू शकते. तशीच स्थिती अन्न प्रक्रिया उद्योगांची आहे. द्राक्ष, कांदा, डाळिंब, भात व भाजीपाला उत्पादनात आघाडीवर असणाऱ्या भागात अन्न प्रक्रिया उद्योग क्षेत्रात आवश्यक तेवढी गुंतवणूक झालेली नाही. जिल्ह्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासह सहकारी औद्योगिक संस्थांच्या वसाहती आहेत. त्यामध्ये वाहन, इलेक्ट्रिक क्षेत्रातील मोठे उद्योग आहेत. त्यावर अवलंबून असणाऱ्या लघु आणि मध्यम उद्योजकांची संख्या हजारोंच्या घरात आहे. उद्योग विश्वाला भेडसावणारे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात कार्यरत औद्योगिक संघटनांच्या सहभागाने लोकसत्ता एसएमई कॉन्क्लेव्ह या उद्योग परिषदेतून उद्योजक, विश्लेषक, सरकारचे प्रतिनिधी यांच्यात व्यापक चर्चा घडविण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा आकार विस्तारण्यासाठी नवी गुंतवणूक आणणे, सामंजस्य करार याद्वारे प्रयत्न होत आहेत. याचा उद्योग क्षेत्रावर होणारा परिणाम, लघु व मध्यम उद्योगांना मिळणारी संधी, रोजगार निर्मिती, या बरोबरच राज्य सरकार नव्या औद्योगिक संधी कुठे उपलब्ध करून देत आहे, आदी माहिती या परिषदेतून मिळणार आहे. या उपक्रमात नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा), नाईस, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, लघुउद्योग भारती, उद्योग व निर्यातदार, वाइन उत्पादक, अपारंपरिक ऊर्जा उत्पादक, आयटी, स्त्री उद्यमी आदी संघटना तसेच सहकारी औद्योगिक विकास वसाहतींचा नाशिक विभागीय औद्योगिक वसाहत संघ, मालेगावातील यंत्रमागधारक संघटनेचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. धुळय़ातील खान्देश औद्योगिक विकास परिषद, खान्देश जिनिंग प्रेस, खान्देश इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट असोसिएशन, जळगावमधील चटई उद्योग व लघु उद्योग भारती आदी संघटनांचे प्रतिनिधीही कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. ही उद्योग परिषद केवळ निमंत्रितांसाठीच आहे.
मुख्य प्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ