अत्याचार निमूटपणे सहन केल्यास टवाळखोरांची हिंमत वाढून अनुचित प्रकार घडत आहेत. आपली कोणी छेड काढत असल्यास इतर कोणी मदतीला येईल, या भ्रमात न राहता सिडकोतील मायलेकींनी छेड काढणाऱ्या चार टवाळांना चोप देत त्यांना पळता भुई थोडी केली. सिडकोतील शिवशक्ती चौकाजवळील डॉ. हेडगेवार चौकात घडलेला हा प्रकार महिलांना स्वसंरक्षणार्थ प्रोत्साहन देणारा तसेच बघ्याची भूमिका घेणाऱ्यांच्या मनोवृत्तीवर प्रकाश टाकणारा आहे.
हेही वाचा >>> राष्ट्रपुरुषांना वेठीस धरण्यापर्यंत वैफल्यग्रस्तांची मजल – केशव उपाध्ये यांची टीका
सिडकोतील पवननगर भागातील महिला हेडगेवार चौकातील मनपा रुग्णालयात जात असताना रस्त्यालगतच्या बाकावर बसलेल्या टवाळखोरांनी या महिलेची छेड काढली. महिलेने सुरुवातीला दुर्लक्ष केले. परंतु, पुन्हा हा प्रकार घडल्याने त्यांचा संताप अनावर झाला. त्यांनी टवाळखोरी करणाऱ्याला जाब विचारला. त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. इतक्यात या महिलेची मुलगी आणि मैत्रीण पाठीमागून दुचाकीवर आल्या. टवाळखोर हे आईची छेड काढत असल्याचे पाहून लेकीने थेट टवाळखोराच्या कानशिलात लगावली. बाजूला जात असलेल्या हातगाडीवरील खुर्ची उचलून टवाळखोराला चोपून काढले. हा रुद्रावतार पाहून टवाळांनी पळ काढला. विशेष म्हणजे, हा प्रकार घडत असताना त्या ठिकाणी उपस्थित असणारे केवळ बघ्याच्या भूमिकेत राहिले. कोणीही मायलेकींच्या मदतीला आले नाही. समाज माध्यमात यासंदर्भातील चित्रफित आल्यानंतर हा प्रकार सर्वांसमोर आला. संबंधित घटना पोलिसांपर्यंत गेलेली नाही. मायलेकींनीही पोलिसांत तक्रार केलेली नाही.