लोकसत्ता वार्ताहर
नंदुरबार : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रातही लाचखोरीची कीड लागल्याने हे क्षेत्रही आता लाचखोरीने ग्रस्त झाल्याचे वारंवार सिद्ध होत आहे. नंदुरबार जिल्ह्यातही असाच प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरात एका व्यक्तीला दारु दुकान सुरु करायचे होते. परंतु, ज्या ठिकाणी त्याला दारु दुकान सुरु करायचे होते, त्या जागेजवळ ७५ मीटरच्या आत जिल्हा परिषदेची शाळा असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने त्यास परवानगी नाकारली होती. सदरची शाळा जीर्ण होवून बंद असल्याने तसे शिक्षण अधिकारी यांच्याकडून प्रमाणपत्र आणण्याचे त्यास सांगण्यात आले होते. यासाठी संबंधिताने नंदुरबार जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी सतीश चौधरी यांच्याकडे धाव घेतली. चौधरी यांनी संबंधितांची अडचण ओळखून तसेच एका संस्थेस आरटीई मान्यता वर्धीत असल्याचे काम करुन देण्याबद्दल ५० हजार रुपयांची मागणी केली.
आणखी वाचा-“शिवसेना आणि ठाकरेंमुळेच आज मोदीजी रस्त्यावर”; मुंबईतील रोडशोवरून संजय राऊतांची खोचक टीका!
संबंधिताने याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. विभागाच्या पथकाने शिक्षण अधिकाऱ्यास जाळ्यात अडकविण्यासाठी सापळा रचला. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातच लाच स्वीकारतांना नाशिक लाचलुचपत प्रतिबंधकच्या पथकाने शिक्षण अधिकारी चौधरी यास रंगेहात ताब्यात घेतले.
शिक्षणासारख्या पवित्र कामातही जिल्ह्यातील सर्वोच्च पद असलेल्या शिक्षण अधिकाऱ्यानेच थेट शाळांशेजारी दारु दुकान सुरु करण्यासाठी मांडलेला खेळ यातून समोर येत आहे. गेल्या महिन्याभरातला हा तिसरा मोठा सापळा असून यामुळे नंदुरबारमधल्या लाचखोरांचे धाबे दणाणले आहे.