धुळे येथे बुद्ध धम्म दीक्षा सोहळ्याचे सात मे रोजी आयोजन करण्यात येणार असून यावेळी २० हजारांहून अधिक अनुयायी धर्मांतर करू शकतील, अशी माहिती आयोजक आनंद लोंढे यांनी दिली आहे. भारतात अलीकडील काळात सांप्रदायिकता वाढीस लागली आहे. जातीय द्वेषातून दलित, मुस्लीम, मागासवर्गीय, बहुजन जातींवर अन्याय, अत्याचार होण्याच्या घटना घडत आहेत. या सर्व असुरक्षित आणि द्वेषकारक वातावरणात जगताना दलित, मागासवर्गियांना शांततेने, सन्मानाने जगू देईल, असा पर्याय हवा, अशी दलित मनामनातील भावना असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा – जळगाव जिल्हा दूध संघातील नोकरभरती रद्द; अध्यक्ष मंगेश चव्हाण यांची माहिती, खडसेंना दणका
धम्म दीक्षा सोहळ्याच्या प्रचार-प्रसाराचे व्यापक कार्य हाती घेण्यात आले आहे. दीक्षा सोहळ्यासाठी कोणतीही बंधने न लावता माणूस म्हणून जगण्याची ज्याची इच्छा आहे. अशा सर्वांसाठी दीक्षा सोहळा खुला ठेवणार आहोत, असे लोंढे म्हणाले. कोणत्याही धर्मातील व्यक्ती या सोहळ्यात बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन आपला नवजीवनप्रवास सुरू करू शकेल. या दीक्षा सोहळ्यासाठी देशविदेशातील बौद्ध भिख्खू (भन्ते) यांना निमंत्रित करून त्यांच्या हस्ते अनुयायांना दीक्षा दिली जाणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील विविध बुद्ध विहार समित्या, सर्व बहुजनवादी संस्था व संघटना यांना देखील आमंत्रित केले जाणार आहे. ज्या अनुयायांना धम्म दीक्षा घ्यावयाची असेल आणि सदर सोहळ्यास मदत करावयाची असेल, त्यांनी अनिल ठाकूर (९०११९१३१५६), अमोल शिरसाठ (७६२०७२२६०६), संदीप गांगुर्डे (८६२३८८०८८६) यांच्याशी किंवा आयोजकांशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजक आनंद लोंढे, किरण गायकवाड, शंकर खरात, प्रा. डॉ. नागसेन बागुल यांनी केले आहे.