नाशिक– धुळे जिल्ह्यातील शिरपूर कृषी बाजार समितीत खंडेराव यात्रेनिमित्त भरलेल्या पशु बाजारात जुनागढ (गुजरात) येथील गीर जाफर जातीची म्हैस विक्रीसाठी येताच एका शेतकऱ्याने ती दोन लाख ६० हजार रुपयांना खरेदी केली. ही म्हैस सलग १५ ते १६ महिने रोज २५ लिटर दूध देते, असा दावा संबंधित व्यापाऱ्याने केल्याने म्हैस पाहण्यासाठी शेतकरी, पशु पालकांनी मोठी गर्दी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत जनावरांचा मोठा बाजार भरतो. राजस्थान,गुजरात या दोन राज्यांशिवाय देशातील अन्य राज्यांतूनही येथे दुभत्या जनावरांसह बैल, रेडे (हेला) विक्रीसाठी आणली जातात. यामुळे जनावरे खरेदी-विक्रीतून १५ दिवसांत कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते. या बाजारात हलक्या आणि भारी अशा दोन्ही पद्धतीच्या जनावरांची उपलब्धी होत असल्याने पंचक्रोशीतील खरेदीदार या बाजारात मोठ्या संख्येने हजेरी लावतात.

शिरपूर कृषी बाजार समितीत एक म्हैस गुजरात राज्यातील जुनागढ येथून अरुण बडगुजर या व्यापाऱ्याने विक्रीसाठी आणली. गीर जाफर जातीच्या या म्हशीची किंमत दोन लाख ६० हजार रुपये असल्याचे बडगुजर यांनी सांगताच बाजार समितीत आलेल्या शेतकरी, पशुपालकांनी म्हैस पाहण्यासाठी गर्दी केली. म्हशीच्या वैशिष्ट्यांविषयी बडगुजर यांनी माहिती दिली. ही म्हैस सलग १५ ते १६ महिने रोज २५ लिटर दूध देत असल्याची माहिती मिळाल्यावर अर्थे (ता.शिरपूर, धुळे) येथील शेतकरी धनराज साळुंके यांनी खरेदी केली. ही म्हैस खरेदी करणाऱ्या साळुंके यांच्याकडे जवळपास ७० म्हशी आहेत. त्यांना गीर जाफर जातीची म्हैस हवी होती. या जातीची म्हैस दिसताच आणि ती अन्य म्हशींच्या तुलनेत दीर्घकाळ अधिक दूध देणार असल्याने त्यांनी लगेच ती खरेदी केली.

देशाच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत शेतीबरोबर पशुपालनाचाही महत्त्वाचा वाटा असल्याने धुळे जिल्ह्यातील  गावागावात शेतकरी गाय, म्हशी, शेळीपालन अशा शेतीपूरक व्यवसायातून अपेक्षित उत्पन्न मिळवत आहेत. जाफराबादी गीर जातीच्या म्हशीच्या माध्यमातून अधिक उत्पन्न मिळवता येत असल्याने ही म्हैस पशुपालकांमध्ये प्रिय आहे. शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अनेक उच्च प्रतीची जनावरे खरेदी-विक्रीसाठी येत असतात. खंडेराव यात्रेनिमित्त देशातील अन्य भागातून लहान मोठे व्यापारी आपली जनावरे विक्रीसाठी आणतात. उच्च प्रतीच्या दुभत्या जनावरांसह चांगले बैल आणि घोडेही या ठिकाणी आणले जातात. खरेदीदारांनी एकदा भेट द्यावी. – मिलिंद पाटील (संचालक, शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती)