लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : सहा महिन्यांपूर्वी डांबरीकरण झालेल्या शहरातील जेलरोडवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून वाहनधारकांना मार्गक्रमण करणे कठीण झाले आहे. अशा खड्डेमय रस्त्याने केवळ बैलगाडी, घोड्यांद्वारे मार्गस्थ होता येईल, हे दर्शविण्यासाठी शिवसेना ठाकरे गट बुधवारी थेट बैलगाड्या व घोडे घेऊन रस्त्यावर उतरला. स्थानिक भाजप आमदाराची आयुक्तांना जाब विचारण्याची कृती केवळ देखावा असून महापालिका पुन्हा त्याच ठेकेदाराला काम देऊन भ्रष्टाचार करणार, असा आरोपही पदाधिकाऱ्यांनी केला.

रस्त्यांवरील खड्डे हा अलीकडेच राजकीय पक्षांच्या आंदोलनाचा मुख्य विषय ठरला आहे. आदल्या दिवशी मनसेने मनपा प्रवेशद्वारासमोर ढोल बजाओ आंदोलन करुन मडकी फोडली होती. भाजपचे आमदार देवयानी फरांदे आणि राहुल ढिकले यांनी खड्डेमय रस्त्यांवरून मनपा आयुक्तांना धारेवर धरले होते. ठाकरे गटाच्या आंदोलनाची कुणकुण लागताच भाजप आमदारांनी नागरी समस्यांना प्रशासकीय राजवटीला जबाबदार धरण्याचा प्रयत्न केला. हा धागा पकडून बैलगाडी, घोडे घेऊन जेलरोडवर आंदोलनात उतरलेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजप आमदारांसह महापालिकेला लक्ष्य केले.

आणखी वाचा-नाशिक: लाचखोर अधिकाऱ्याला सीबीआय कोठडी

जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर, महानगरप्रमुख विलास शिंदे. सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात माजी नगरसेविका रंजना बोराडे व प्रशांत दिवे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दत्तक नाशिकची झाली दुर्देशा, रस्ता बनवा, अपघात थांबवा, विद्यार्थ्यांचे हाल असे फलक घेत महापालिकेविरोधात घोषणााबाजी करण्यात आली. नाशिकरोड विभागातील जेलरोड हा मुख्य रस्ता व उपनगर कॅनॉल रोड खराब झाल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळे येत आहेत. विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक व व्यावसायिकांचे हाल होत आहेत. जेलरोडवरील अपघातात वाढ झाल्याकडे आंदोलकांनी लक्ष वेधले. गणेशोत्सवापूर्वी जेलरोडची दुरुस्ती न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

आणखी वाचा- नाशिक: खड्ड्यांसह नागरी समस्यांविषयी भाजप आमदारांचा मनपा आयुक्तांना इशारा

शहरातील रस्त्यांची अवस्था वाईट आहे. सत्तेत असणारे देखावे करण्यासाठी आयुक्तांना भेटतात. सहा महिन्यांपूर्वी जेलरोडचे काम झाले होते. अवघ्या सहा महिन्यात रस्त्याची दुर्दशा झाली. मनपा पुन्हा त्याच ठेकेदाराला काम देईल आणि पुन्हा भ्रष्टाचार केला जाईल. हे प्रकार बंद झाले पाहिजेत. -दत्ता गायकवाड (सहसंपर्कप्रमुख, ठाकरे गट)