नाशिक – प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी नंदुरबारहून निघालेला बिऱ्हाड मोर्चा शहरात आल्यावर वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला. पोलिसांनी ठरवलेल्या नियोजित मार्गावरून मोर्चा मार्गस्थ न झाल्याने वाहतूक नियोजन कोलमडल्याने ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली.
सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा यांच्या वतीने नंदुरबारपासून निघालेला बिऱ्हाड मोर्चा सोमवारी सकाळी शहरात शिरला. मोर्चा रविवार कारंजा येथे आल्यावर शालिमारमार्गे पुढे मार्गस्थ होणे पोलिसांच्या नियोजनानुसार अपेक्षित असताना हा मोर्चा अशोकस्तंभच्या दिशेने गोल्फ क्लबकडे जाऊ लागला. यामुळे वाहतूक कोंडी होण्यास सुरूवात झाली. हजारोंच्या संख्येने मोर्चेकरी असल्याने पंचवटी, रविवार कारंजा, अशोक स्तंभ, सीबीएस, गोल्फ क्लब मैदान परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहनधारक अडकून पडले.
हेही वाचा – नाशिकमध्ये डोळ्यांवर फवारा मारुन दागिने लंपास, महिलेचा प्रताप
हेही वाचा – नाशिक : बिऱ्हाड मोर्चा स्थगित, जिल्हाधिकाऱ्यांशी मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा
शहर बससेवेसह इतर प्रवासी वाहने, दुचाकी कोंडीत सापडल्या. वाहनचालकांसह पायी चालणाऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. काही दुचाकी धारकांनी इतर पर्यायी मार्गाचा अवलंब करुन पाहिल्याने काेंडीत अधिकच भर पडली. बस अडकल्याने विद्यार्थ्यांसह नागरिकांना अडचणी आल्या. वाहतूक कोंडी फुटण्यास एक तासाहून अधिक वेळ लागला. मोर्चातून कोणी वाट काढून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला असता मोर्चेकऱ्यांकडून आरडाओरड केली जात होती. त्यामुळे मोर्चा जाईपर्यंत नागरिकांना थांबून राहण्याशिवाय पर्याय उरला नाही.