नाशिक: शेअर बाजारात पैसे गुंतवण्यासाठी शहर आणि ग्रामीण भागात उच्चभ्रू वसाहतीतील बंद घरे हेरून घरफोडी करणाऱ्या उच्च वर्गातील दुकलीला पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित चोरटे हे चोरलेल्या मोटारीतून भ्रमंती करायचे. याच वाहनात घरफोडीसाठी लागणारे अत्याधुनिक साहित्य त्यांनी ठेवले होते. संशयितांच्या अटकेमुळे गंगापूर रस्त्यावरील शारदानगर भागातील घरफोडीच्या गुन्ह्यासह शहर व ग्रामीण भागातील चार गुन्हे उघडकीस आले आहेत. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने ही कामगिरी केली.
शारदानगर भागातील शरण बंगल्यात २४ डिसेंबर रोजी घरफोडी झाली होती. चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी कापून आतमध्ये प्रवेश करुन रोख रक्कम, सोन्याचे दागिने, किंमती घड्याळ, एअर पॉड असा सुमारे अडीच लाखाचा मुद्देमाल चोरला होता. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या युनिट एककडून समांतरपणे सुरु होता. घटनास्थळावरील सीसीटीव्ही चित्रण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयित हे गुजरातच्या वापी भागात असल्याचे समजल्यानंतर पोलीस पथकाने धाव घेऊन संशयित रोहन भोळे (३६, उपनगर) आणि ऋषिकेश उर्फ गुड्डू काळे (२७, नाशिकरोड) या दोघांना ताब्यात घेतले. संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडे तक्रारदाराचे एअरपॉड, किंमती घड्याळ, चोरीस गेलेली बॅग आढळली. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट मोटारही चोरीची असल्याचे उघड झाले. मोटारीत घरफोडी करण्यासाठी कटावणी, स्क्रू ड्राइव्हर, ग्राइंडर, करवत, गॅस गन, लहान गॅस सिलिंडर असे साहित्य होते. तपासात संशयितांकडून ३० ग्रॅम सोन्यासह एकूण साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
हेही वाचा… नाशिक : नांदगाव तालुक्यात शस्त्रांसह तिघे ताब्यात
संशयित हे उच्च वर्गातील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याकडील मोटारीचा गुन्हा ओझर पोलीस ठाण्यात दाखल आहे. संशयितांनी यापूर्वी उच्चभ्रू भागातील बंद बंगल्यांची टेहळणी करून नाशिकरोड, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी केल्याचे उघड झाले. ओझर येथील घरफोडीत संशयितांनी घरातून चावी घेऊन मोटार पळवून नेली होती. सिन्नर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात संशयितांचा सहभाग आहे. नाशिकरोड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात रोहन भोळे हा फरार आहे. न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली.
या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा युनिट एकचे उपनिरीक्षक चेतन श्रीवंत करत आहेत. तपासात संशयितांनी शहरात केलेल्या आणखी घरफोड्या, चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे. चोरट्यांना ताब्यात घेण्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट एकचे निरीक्षक विजय ढमाळ, सहायक निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, विष्णू उगले आदींच्या पथकाने केली.