लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव: शहरातील पिंप्राळा उपनगरातील सेंट्रल बँक कॉलनीत बंद घर फोडून रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने चोरीप्रकरणी अवघ्या काही तासांतच चार संशयितांना रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या पथकाने बेड्या ठोकल्या. संशयितांकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला.
पिंप्राळा उपनगरातील सेंट्रल बँक कॉलनीत प्रशांत माहोरे हे कुटुंबियांसह वास्तव्यास आहेत. ते आजीचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी दरवाजाचा कडीकोयंडा तोडत रोकडसह सोन्या-चांदीचे दागिने, असा सुमारे २६ हजारांचा मुद्देमाल चोरला. माहोरे यांना लहान भावाने भ्रमणध्वनीवरून घरात चोरी झाल्याचे सांगितले. घरी आल्यानंतर माहोरे यांना कपाटातील रोकड व सोन्या-चांदीचे दागिने चोरल्याचे दिसून आले.
आणखी वाचा-जळगावजवळील अपघातात तरुणीचा मृत्यू, चौघे गंभीर
याप्रकरणी रामानंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांना चार जणांनी घरफोडी केल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने संशयित सागर गवई (२३, रा. पिंप्राळा-हुडको), अब्रार खाटीक (१८, रा. उस्मानिया पार्क), समीर शेख (२२) आणि अमोल शिरसाठ (२५, रा. दूध फेडरेशन, शिवाजीनगर-हुडको) यांना बेड्या ठोकल्या.