बागलाण तालुक्यातील मांगीतुंगी येथे फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या धार्मिक सोहळ्याच्या पाश्र्वभूमीवर येथील बस स्थानकाचे नूतनीकरण करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मांगीतुंगी येथे जाण्यासाठी ताहाराबाद बस स्थानकावरूनच जावे लागते. स्थानकाची मोठय़ा प्रमाणात बिकट अवस्था झाली असल्याने प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. १९९४ मध्ये हे स्थानक तयार करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत स्थानकाचे कोणत्याही प्रकारचे दुरूस्तीचे काम झालेले नाही. त्यामुळे स्थानक म्हणजे समस्यांची बजबजपुरी झाले आहे. विशेषत: प्रसाधनगृहाची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शौचालय तर अस्तित्वातच नाही. आवारातील पथदीप अनेक वर्षांपासून बंद आहेत. आवारातील डांबरीकरण पूर्णपणे रखडल्याने ठिकठिकाणी खड्डे पडून खडी वर आली आहे. बसच्या टायरखालून निसटणारी खडी प्रवाशांना त्रासदायक ठरत आहे. पावसाळ्यात आवारचे रूपांतर तलावात होते.
स्थानकावरून कित्येक लांब पल्ल्याच्या गाडय़ा धावतात. दररोज शेकडो गाडय़ा आणि हजारो प्रवाशांसाठी या स्थानकाचा वापर होतो. फेब्रुवारीमध्ये मांगीतुंगी येथे होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमास देशभरातून लाखो भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. सर्व भाविकांना मांगीतुंगी येथे जाण्यासाठी ताहाराबादमार्गेच जावे लागणार आहे. ताहाराबादवरून विंचूर-प्रकाशा व औरंगाबाद-अहवा हे दोन राज्य महामार्ग जातात. भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून स्थानकाला नवीन रूप मिळणे आवश्यक आहे. दोन वर्षांपूर्वी स्थानकाच्या समस्या सोडवण्यासाठी बागलाण युवक काँग्रेसच्या वतीने मिलींद चित्ते, यशवंत पवार, निवृत्ती सोनवणे यांनी उपोषण केले होते. त्यावेळी परिवहन महामंडळाकडून दोन महिन्यात समस्या सोडविण्याचे आश्वासन देण्यात आले होते.
स्वच्छता कामगाराची नेमणूक होण्याशिवाय दुसरे कोणतेही काम झालेले नाही. सातत्याने पाठपुरावा करूनही महामंडळाकडून टाळाटाळ केली जात असल्याने प्रवाशांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

Story img Loader