नाशिक : विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील राजकीय भूकंप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा या दिवशीचा रद्द झालेला त्र्यंबकेश्वर दौरा या घटनाक्रमाचा परस्परांशी काही संबंध आहे का, याचे आडाखे आता राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत. जागतिक योग दिनानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात योग दिन कार्यक्रम होणार होता. ऐनवेळी त्यांच्याऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय नाशिकला आले. अनेक राज्यांत राजकीय भूकंप घडविणाऱ्या अमित शाह यांचे महाराष्ट्रवर आधीपासून लक्ष आहे. बंडाळीनंतर सेनेच्या आमदारांचे गुजरातला जाणे, गुजरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मिळणे, भाजपच्या दिल्लीतील गोटात खलबते सुरू होणे, या घटना आणि अमित शाह यांचा रद्द झालेला दौरा हा योगायोग नसल्याची भावनाही राजकीय वर्तुळात उमटत आहे.

जागतिक योग दिनी सुरू झालेल्या राजकीय योगासनांनी राज्याच्या राजकारणात भूकंप उडाला आहे. विधान परिषद निवडणुकीनंतर सेनेचे अनेक आमदार थेट गुजरातला गेले. मंगळवारी सकाळी त्याची माहिती उघड झाली. परंतु, हे अकस्मात घडलेले नाही. पूर्वनियोजनाशिवाय ते अशक्य आहे. त्याची कुणकुण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना असावी. त्यांच्याकडून सेनेच्या फुटीर आमदारांना रसद पुरविली गेल्याचे बोलले जाते.

जागतिक योग दिनी अमित शहा यांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वर मंदिर प्रांगणात योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरक्षेच्या दृष्टीने कार्यक्रमास उपस्थितांची संख्या मर्यादित राखण्याचे निश्चित झाले. पावसाचा व्यत्यय नको म्हणून प्रांगणात जलरोधक शामियाना उभारला गेला. प्रशासकीय पातळीवर कार्यक्रमाची जय्यत तयारी झाली असताना दोन दिवस आधी अमित शहा यांचा दौरा रद्द झाल्याची माहिती भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

शाह यांच्याऐवजी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या उपस्थितीत मंगळवारी हा कार्यक्रम पार पडला. मंगळवारीच राज्यातील सत्ताधारी शिवसेनेत अनेक आमदारांनी बंडाचा झेंडा फडकावल्याचे उघड झाले. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आमदार सूरतमध्ये पोहोचले. तिथे गुजरात पोलिसांचा बंदोबस्त मिळाला. भाजपची सत्ता असणारे हे राज्य आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपात गुजरातची महत्वाची भूमिका राहिल्याचे दिसून येते. या घडामोडींचा अंदाज आल्याने अमित शहा यांनी नाशिक दौरा रद्द करत राजकीय डावपेचाला प्राधान्य दिल्याचे मानले जाते. तथापि, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांनी ही बाब नाकारली. शहा यांचा दौरा रद्द होणे आणि राज्याच्या राजकीय वर्तुळातील घडामोडी यांचा कुठलाही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालय शिलापूजन कार्यक्रमास शहा हे आभासी पध्दतीने उपस्थित राहिल्याचे आहेर यांनी नमूद केले.

पूर्वनियोजन?

बंडाळीनंतर सेनेच्या आमदारांचे गुजरातला जाणे, गुजरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त मिळणे, भाजपच्या दिल्लीतील गोटात खलबते सुरू होणे, या घटना आणि अमित शाह यांचा रद्द झालेला दौरा हा योगायोग नसल्याची भावनाही राजकीय वर्तुळात उमटत आहे. जागतिक योग दिनी सुरू झालेल्या राजकीय योगासनांनी राज्याच्या राजकारणात भूकंप उडाला आहे. हे अकस्मात घडलेले नाही. पूर्वनियोजनाशिवाय ते अशक्य आहे.