नाशिक; कर्करोग आजाराला रोखण्यासाठी नागरिकांची फिरत्या वाहनाव्दारे तपासणी केली जात आहे. हे वाहन नाशिक विभागातील गावागावात जात असून नि:शुल्क तपासणी करण्यात येत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून आतापर्यंत १० हजारपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्करोगाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने या आजाराविषयी जनजागृती आणि नागरिकांची तपासणी करण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमातंर्गत कर्करोगाची लक्षणे, त्यावर तत्काळ स्वरुपाचे उपाय याविषयी माहिती दिली जात आहे. कर्करोग पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यात असताना त्याचा फारसा त्रास जाणवत नसल्याने नागरिक या आजाराविषयी बेसावध असतात. त्यामुळे वेळीच या आजाराची लक्षणे आढळून उपाय केल्यास या आजारातून बरे होण्यास मदत मिळते.

जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने चार ते २५ फेब्रुवारी या कालावधीत कर्करोगासंदर्भात नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. याअंतर्गत कर्करोग डायग्ननोस्टिक व्हॅन आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत पोर्टल एक्स्प्रेस कार्यान्वित आहे. मोहिमेला सुरूवात होऊन तीन दिवस झाले आहेत. तोंडाचा, स्तनांचा आणि गर्भाशयमुखाच्या कर्करोगाची तपासणी आणि उपचार सुविधा वाहनाव्दारे दिल्या जात आहेत. हे वाहन जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर. पेठ, सुरगाणा येथे फिरले आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय याठिकाणी कर्करोग तपासणी शिबीर घेण्यात येत आहे. बाह्यरुग्ण विभागातील दंत चिकित्सक तसेच अन्य डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.

तालुकानिहाय तपासणी वेळापत्रक

कर्करोग तपासणी मोहिमेतंर्गत १४ फेब्रुवारी रोजी दिंडोरी, १५ कळवण, १७ देवळा, १८ आणि १९ बागलाण, २० मालेगाव, २१ नांदगाव, २२ चांदवड, २४ येवला, २५ निफाड, २६ सिन्नर, २७ इगतपुरी आणि २८ फेब्रुवारी रोजी गिरणारेसह इतर रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात येणार आहे.

१० हजारपेक्षा अधिक जणांंची तपासणी

नाशिक जिल्ह्यात चार फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या मोहिमेत आतापर्यंत १० हजारांहून अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. दोनशेहून अधिक नागरिकांमध्ये कर्करोगसदृश लक्षणे आढळली आहेत. २५ जणांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.