नाशिक : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या वतीने जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त शनिवारी डोंगरे वसतिगृह मैदानावर शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा पार पडला. मेळाव्याच्या माध्यमातून पाच हजारांहून अधिक तरूणांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला असतांना मेळाव्यातील चित्र मात्र वेगळे होते.
मेळाव्यात रोजगार देणाऱ्या ४७ विविध नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहुन ४५०० पेक्षा जास्त पदांसाठी मुलाखती घेणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात शनिवारी ऊन-पावसाचा खेळ, मैदानावर झालेला चिखल याचा परिणाम मेळाव्यावर झाला. शासन आपल्या दारी उपक्रमात आलेले लाभार्थी, वेगवेगळ्या महाविद्यालयांचे विद्यार्थी यांची मेळाव्यात उपस्थिती होती. मेळाव्यात कंपनी प्रतिनिधींना माहिती संकलन करतांना, लाभार्थ्यांना अर्ज देतांना अडचणी आल्या.
युवकांना मेळावा नेमका का, कशासाठी, याची फारशी माहिती नव्हती. नाव, शिक्षण, काय करायला आवडेल, काम कुठे कराल या चौकटीत मुलाखतींचा सोपस्कार पडला. युवकांना काय करायला आवडेल, हेे विचारले असता अनेकांनी तुम्ही सांगाल ते काम करू, अशी उत्तरे दिली. नोकरीच नाही. ठिकठिकाणी अर्ज दिले आहेत. पहा, तुमच्याकडून काही होते का, अशी उत्तरे उमेदवारांकडून आल्याने काहींनी डोक्याला हात लावून घेतला.
देवळाली कॅम्प येथून आलेल्या अश्विनी आणि निकिता पांडे या बहिणींनी त्यांचा अनुभव सांगितला. अभियांत्रिकी तसेच वाणिज्य शाखेच्या आम्ही पदवीधर आहोत. केवळ आमचे माहितीपत्र घेतले. आम्हाला फारसे प्रश्न कोणी विचारले नाहीत. याठिकाणी काही होईल, असे वाटत नाही, असे त्यांनी सांगितले. मनवा महाले हिने आपण एक, दोन ठिकाणी माहितीपत्र दिले असून मित्र-मैत्रीणींनी या मेळाव्याविषयी सांगितले. त्यांच्याकडून माहिती घेत त्यांचेही अर्ज भरले आहेत. पण ढिसाळ नियोजनामुळे हाती काही लागेल, याविषयी साशंकता वाटते, असे तिने सांगितले. शासन आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात नऊ हजाराहून अधिक बेरोजगारांनी नोंदणी केली. त्यातील २४०० हून अधिक उमेदवारांची प्राथमिक निवड होऊन त्यातील १८७ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
युवा शक्ती फाउंडेशनतर्फे रोजगार संधी
युवा शक्ती फाउंडेशनच्या वतीने पाच हजार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी दिली. फाउंडेशनच्या केंद्रात सहा हजार तीनशे बेरोजगारांनी आपली नावे नोंदवली त्यातून पाच हजार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली.