नाशिक : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. उमेदवारांच्या या उत्साहाचा दोन दिवसांपासून नाशिककरांना त्रास होत असून मंगळवारचा दिवसही वेगळा राहिला नाही. दिवाळीनिमित्त खरेदीसाठी बाहेर पडणारे नाशिककर आणि राजकीय पक्षांचे समर्थक यामुळे झालेली गर्दी ही सर्वांच्या संयमाची परीक्षा पाहणारी ठरली. उमेदवार जरी वेगवेगळ्या पक्षांचे असले तरी फेरीत सहभागी होणारे अनेक चेहरे सारखेच होते. फेऱ्यांमधील गर्दीने वाहतूक कोंडीत भर पडली.
मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील त्या त्या मतदारसंघांच्या दालनात इगतपुरीतून महाविकास आघाडीचे लकी जाधव, नाशिक पूर्वमधून गणेश गिते, नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर तसेच नाशिक मध्यमधून अपक्ष रंजन ठाकरे, वंचित बहुजन आघाडीचे मुशीर सय्यद, नाशिक पश्चिममधून करण गायकर, इगतपुरीत मनसेकडून काशीनाथ मेंगाळ यांनी अर्ज भरले. अर्ज भरण्याआधी उमेदवारांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. उमेदवारांकडून होणारी गर्दी लक्षात घेत पोलिसांनी सीबीएस ते अशोकस्तंभ परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता. महात्मा गांधी रोड, शालिमार, सार्वजनिक वाचनालयासमोरील रस्ता, एन. डी. पटेल रोड, रविवार कारंजा यासह अन्य भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली.
हेही वाचा…दादा भुसे यांच्यापेक्षा त्यांची पत्नी अधिक श्रीमंत, पाच वर्षात संपत्तीत तिप्पट वाढ
उमेदवारांबरोबर येणारी गर्दी ठराविक रस्त्यानेच जावी, इतरत्र जावू नये यासाठी वकीलवाडी, मेनरोड परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर दुभाजक लावण्यात आले होते. सकाळपासूनच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी तसेच समर्थकांची वर्दळ सुरू होती. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील अशोकस्तंभ ते सीबीएस परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवला होता. याशिवाय या रस्त्याकडे येणारे जोडरस्ते हे वाहतुकीसाठी बंद ठेवतांना दुभाजक लावण्यात आले होते. उमेदवारांनी काढलेल्या फेऱ्यांमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. फेरीत सहभागी होणाऱ्या महिलांना पिण्याचे पाणी तसेच अन्य व्यवस्था करण्यात आली होती. फेरीत काही काळ चालल्यानंतर या महिला सावलीत काही ठिकाणी उभे राहत होत्या. काही निम्म्या रस्त्यातून माघारी फिरल्या. उन्हाचा चटका सहन न झाल्याने काहींना त्रास झाला.
हेही वाचा…सुवर्णनगरीतील गिरीश महाजन यांच्याकडे पावणेतीन किलो सोने, पाच वर्षात वार्षिक उत्पन्नात साडेचार पट वाढ
दरम्यान, अर्ध्या रस्त्यावरून परत फिरलेल्या महिला दुसऱ्या उमेदवाराच्या फेरीतही सहभागी होत होत्या. काही ठिकाणी या महिला घाेळका करून उभे राहून पैशांसाठी वाद घालत असल्याचेही दिसले. अशा घोळक्यांमुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडत होती. या फेरीमुळे अनेक रस्त्यांवर वाहतूक संथपणे पुढे सरकत राहिली. यामुळे बऱ्याच ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले. या गर्दीत रुग्णवाहिका अडकल्याने तिच्यासाठी वाट करुन देताना कसरत करावी लागली. वाहतूक पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावरील गर्दीवर नियंत्रण ठेवणे अशक्यप्राय झाले होते. दुपारी चारनंतर राजकीय गर्दी ओसरल्यानंतर दिवाळी खरेदीसाठी गर्दीला उधाण आले.