वन विभागाच्या प्रयत्नांना यश

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इगतपुरी : तालुक्यातील पिंपळगाव मोर येथे लहानग्या मुलीला पळवणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे. सुटका पथकाच्या मदतीने चार ठिकाणी पिंजरे लावण्यात आले होते. पथक पाच दिवसांपासून या नरभक्षी बिबट्यावर नजर ठेवून होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास नरभक्षक बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची माहिती इगतपुरी वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे यांनी दिली.

तालुक्यात बिबट्यांचा संचार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पशुधनावर ताव मारणारे बिबटे आता नरभक्षक होऊ लागल्याने तालुक्याच्या पूर्व भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.  पिंपळगाव मोर शिवारात बिबट्याने सहा वर्षांच्या बालिकेचा बळी घेतल्यावर ग्रामस्थांनी बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी के ली होती. या प्रकाराने वन विभागाची यंत्रणाही खडबडून जागी झाली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने जागोजागी एकाच वेळी चार पिंजरे लावले. बिबट्याचा मार्ग टिपण्यासाठी कॅ मेरेही लावण्यात आले होते. घटनास्थळी वन परिक्षेत्र अधिकारी रमेश ढोमसे, वन परिमंडळ अधिकारी इ. टी. भले, वनरक्षक एस. के. बोडके, एफ. जे. सैयद, आर. टी. पाठक, एम. जे. पाडवी, बी. एस. खाडे आदी उपस्थित होते.

बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे परिसरात समजताच बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. उपस्थितांकडून बिबट्याचे छायाचित्र काढण्यासाठी गोंधळ सुरू झाल्याने बिबट्याने पिंजऱ्यातच धडका देणे सुरू के ल्याने तो मोठ्या प्रमाणात जखमी झाला. अखेर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सकाळी ९ वाजता बिबट्या जेरबंद असलेला पिंजरा घाटनदेवी परिसरात असलेल्या वन विभागाच्या जागेत हलवला. या ठिकाणी या बिबट्यावर उपचार करून त्याची चाचणी घेतली जाणार आहे. मृत्युमुखी पडलेल्या दोन बालिकांची शिकार करणारा बिबट्या हाच आहे का, हे तपासले जाणार असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी ढोमसे यांनी दिली. चार दिवसांपूर्वीही अधरवड परिसरात एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते.

दोन दिवसांपूर्वी नाशिक विभागाचे उपवनसंरक्षक पंकजकुमार गर्गे यांनी पिंपळगाव मोर शिवारात भेट देऊन घटनेचा आढावा घेत नरभक्षक बिबट्यास अडकविण्यासाठी सूचना दिल्या होत्या. दुसरीकडे, अधरवड आणि पिंपळगाव मोर येथील नरभक्षक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या बालिकेच्या वारस कुटुंबास शासनाने तात्काळ आर्थिक साहाय्य करण्याची मागणी  नागरिकांनी केली आहे.

इगतपुरी तालुक्यात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून  स्थानिकांनी जंगलामध्ये पशुधन चारण्यासाठी घेऊन जाऊ नये.  जंगलात सरपण आणण्यासाठी किं वा फिरण्यासाठी जाऊ नये. रात्री गोठ्यांचे दरवाजे बंद ठेवून लहान मुले बाहेर फिरत असतील तर त्यांची विशेष काळजी घ्यावी.

– रमेश ढोमसे (वन परिक्षेत्र अधिकारी, इगतपुरी)