नाशिक: आधुनिकीकरणात समाविष्ट झालेली प्रगत उपकरणे व टेहळणी यंत्रणा. नव्याने समाविष्ट होणारे ड्रोन, वेगवेगळ्या क्षमतेच्या अद्ययावत तोफा, आदींचे सादरीकरण मंगळवारी तोफखाना स्कूलतर्फे आयोजित तोपची या वार्षिक सोहळ्यात प्रदर्शनातून घडविण्यात आले. तोफगोळ्याच्या अचूक लक्ष्यभेदातून तोफखाना दलाच्या प्रहारक क्षमता, गनर्सचे कौशल्य व क्षमता अधोरेखीत करण्यात आली.
देवळाली कॅम्पस्थित तोफखाना स्कूलतर्फे आयोजित या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्कूलचे कमांडंट तथा तोफखाना रेजिमेंटचे कर्नल कमांडेट लेफ्टनंट जनरल नवनीत सिंह सरना उपस्थित होते.याप्रसंगी वेलिंग्टनच्या संरक्षण सेवा महाविद्यालय व पुणेस्थित संरक्षण तांत्रिक सेवा अभ्यासक्रमातील प्रशिक्षणार्थी, नेपाळसह अन्य देशातील लष्करी अधिकारी, भारतीय लष्करातील अधिकारी उपस्थित होते. प्रदर्शनात विविध आधुनिक तोफांसह पिनाका, स्मर्च रॉकेट लाँचर, स्वार्म ड्रोन, लॉयट्रींग म्यूनिशन आणि प्रगत ड्रोन सादर झाले.
हेही वाचा >>>नाशिक : चुलतबहिणीनंतर जखमी अल्पवयीन मुलीचाही मृत्यू, ओझर दुचाकी अपघात
कार्यक्रमस्थळी पाहुण्यांचे आगमन होताच तोफगोळे डागून सलामी देण्यात आली. तोफखाना दलाकडील मोर्टर वगळता इतर अवजड सामग्रीच्या वाहतुकीसाठी लष्कराचे ताकदवान वाहन लागते. १२० एम.एम. मोर्टर ही तुलनेत कमी म्हणजे सव्वा दोनहून अधिक टनची आहे. ही तोफ हेलिकॉप्टरमधून अथवा तोफखान्याच्या जवानांकडून युध्दभूमीवर तैनात केली जाते. त्याचे प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले.
दीड तास चाललेल्या कार्यक्रमात तोफा आणि रॉकेटच्या भडिमारामुळे फायरिंग रेंजला युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी स्वदेशी बनावटीच्या के – ९ वज्र, धनुष, बोफोर्स, हलक्या वजनाच्या तोफा प्रात्यक्षिकात सहभागी झाल्या होत्या. एकाचवेळी ४० रॉकेट डागण्याची क्षमता असणारे १२२ एम.एम. मल्टीबॅरल रॉकेट लाँचर, पिनाका आणि हेलिकॉप्टरच्या कामगिरीचे दर्शन घडविण्यात आले. अचूक लक्ष्यभेदाचे मानवरहित विमानांनी निरीक्षण केले. रडारवर आपले अस्तित्व अधोरेखीत होऊ नये म्हणून जमिनीलगत कमी उंचीवरून मार्गक्रमण करणारे हेलिकॉप्टर, तोफखान्याचा माऱ्यात महत्वाची भूमिका निभावणारी ‘साटा’ अर्थात टेहळणी-लक्ष्य निश्चिती विभागाची उपकरणांची कार्यपद्धती अधोरेखीत करण्यात आली. आठ हजार फूट उंचीवरून झेपावत अधिकाऱ्यांनी हवाई छत्रीतून उतरण्याचे कसब दाखवले.
हेही वाचा >>>मनमाड-इंदूर रेल्वेमार्ग भूसंपादनास लवकरच सुरुवात, अधिकाऱ्याची नियुक्ती
अल्पावधीत सज्जता
प्रात्यक्षिकावेळी बिनतारी यंत्रणेद्वारे संदेश मिळाल्यानंतर तोफा अल्पावधीत भडिमारासाठी सज्ज झाल्या. विविध तोफांनी एकच भडिमार सुरू केला. फायरिंग रेंजचा परिसर धुराने वेढला गेला. तोफखाना दल अल्पावधीत कशा पद्धतीने हल्ल्यासाठी सज्ज होऊ शकते, ते दाखवण्यात आले.