लोकसत्ता प्रतिनिधी
जळगाव : राज्यातील दिग्गज नेत्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकविण्याच्या कथित प्रकरणात गोत्यात आलेले माजी विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यासह पाच जणांविरुद्ध चार कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात तेजस मोरे (रा. जिल्हा परिषद कॉलनी, जळगाव) यांनी तक्रार दिली आहे. महाविकास आघाडी सत्तेत असताना गिरीश महाजन यांच्याविरुद्ध निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाला मराठा विद्याप्रसारक मंडळातील अंतर्गत वाद कारणीभूत असल्याचा, तर खडसेंच्या सांगण्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा आरोप महाजनांकडून झाला होता. राज्यात सत्तांतरानंतर ॲड. चव्हाण यांच्या कार्यालयात केलेले स्टींग ऑपरेशन समोर आले होते. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आता हेच ॲड. चव्हाण नव्याने वादात सापडले आहेत. चार कोटींची खंडणी मागितल्याच्या आरोपातून चव्हाण, त्यांचे पुत्र आणि अन्य तीन, अशा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा-जळगाव शहराचा परमेश्वरच वाली, सुरेश जैन यांचे मत
मोरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते जळगाव येथे १६ नोव्हेंबरच्या रात्री अकरा ते साडेअकराच्या दरम्यान जिल्हा परिषद कॉलनीतील रस्त्यावर शतपावली करीत असताना मुखपट्टी लावून आलेल्या चौघांनी अडवले. त्यातील एकाने अर्वाच्च भाषा वापरत चार कोटी आताच दे, नाहीतर तुला जीवेच ठार मारतो, अशी धमकी दिली. त्यातील एकाने कानाखाली मारल्याने, मोरे यांनी आरडाओरड केल्याने चौघेही महामार्गाच्या दिशेने पसार झाले. या तक्रारीवरुन ॲड. चव्हाण आणि त्यांचा मुलगा चिन्मय चव्हाण यांच्यासह विलास आळंदे, निखिल आळंदे, स्वप्नील आळंदे (सर्व रा. पुणे) या पाच जणांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.