नाशिक – सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत २०१७-१८ या काळातील खरेदी प्रक्रियेत अनियमितता आणि तंत्र प्रदर्शन स्पर्धेच्या आयोजनावेळी बनावट देयके सादर करुन सुमारे २० लाखांच्या शासकीय निधीचा अपहार केल्या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संस्थेचे तत्कालीन प्रभारी प्राचार्य सुभाष कदम यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपअधीक्षक वैशाली पाटील यांनी तक्रार दिली. सातपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात २०१७ ते २०१८ आणि २३ मार्च ते ३० मार्च २०१८ या कालावधीत हा प्रकार घडल्याचे तक्रारीत म्हटले आहे. संस्थेचे प्रभारी प्राचार्य सुभाष कदम यांनी पदाचा गैरवापर करून मनमानी कारभार केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसाठी जेईएम पोर्टलवरून खरेदी प्रक्रियेदरम्यान मागणी केलेल्या साहित्याचे पुरवठादार गेटवे सिस्टीमचे संचालक रोशन बधान आणि गोकुळ पूरकर यांनी निश्चित झालेल्या निकषानुसार साहित्याचा पुरवठा केलेला नसताना हे साहित्य त्यांनी केंद्रासाठी घेतले. पुरवठादारांशी संगनमत केले. तसाच प्रकार २०१७ मध्ये आयोजित तंत्र प्रदर्शन स्पर्धेवेळी घडला. या प्रदर्शनाचे नियमानुसार आयोजन केले गेले नाही. बनावट देयके सादर केली गेली. त्यात भोजनासह अन्य देयकांचाही समावेश आहे. या दोन्ही प्रकारात एकूण १९ लाख ५० हजार ६८२ रुपयांच्या शासकीय निधीचा स्वत:च्या फायद्यासाठी दुरुपयोग केला गेला. शासनाची फसवणूक व बनावटीकरण करून शासकीय निधीचा गैरवापर व अपहार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी संस्थेचे तत्कालीन प्रभारी प्राचार्य कदम यांच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमासह, फसवणूक व विविध कलमांद्वारे सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.