लोकसत्ता वार्ताहर
धुळे: वैद्यकीय व्यवसायाचा परवाना नसताना परिसरातील रहिवाशांवर औषधोपचार केल्याने तीन बनावट डॉक्टरांविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा समजदार, संजय आहुजा (दोन्ही रा.छडवेल,साक्री) आणि संतू बैरागी (चिपलीपाडा,साक्री) अशी संशयितांची नावे आहेत.
आणखी वाचा-‘एमआयएम’ची मागणी अन सत्ताधाऱ्यांकडून पूर्तता; ठाकरे गटाच्या मोर्चात विद्यार्थ्यांना सहभागास मनाई
छडवेल येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार या तिघांकडे वैद्यकीय व्यवसायासाठी आवश्यक असलेला कुठलाही परवाना नाही. तसेच वैद्यकीय शिक्षणाचे प्रमाणपत्रही नाही, तरीही त्यांनी स्वतःकडे औषधसाठा ठेवून परिसरातील रुग्णांवर औषधोपचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी या तिघांकडे छापा टाकून त्यांच्याविरुद्ध निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले, नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.