नाशिक – विवस्त्र करून धिंड काढण्याची धमकी देत नातेवाईकांनी एका महिलेस ट्रॅक्टर अंगावर घालून मारण्याचा प्रयत्न करुन विनयभंग केला. शहराजवळील शिलापूर येथे हा प्रकार घडला. न्यायालयाच्या आदेशान्वये या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरूध्द विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिलापूर शिवारातील गट नं. १६ आणि १७ मध्ये २९ मे २०२३ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी वसंत कहांडळ, प्रकाश कहांडळ, भानुदास कहांडळ, भास्कर कहांडळ आणि विश्राम कहांडळ अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. संशयित हे तक्रारदाराचे नातेवाईक आहेत. २९ मे रोजी पीडिता आपल्या शेतात काम करत असतांना संशयितांनी तिच्या अंगावर ट्रॅक्टर घालून मारण्याचा प्रयत्न केला. यावेळी पीडितेने जीव वाचविण्यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संशयितांनी तिला कपडे काढून धिंड काढण्याची धमकी दिली. प्रकाश कहांडळने तिचा विनयभंग केला. याबाबत पोलिसांकडे दाद मागूनही न्याय न मिळाल्याने पीडितेने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाच्या आदेशाने पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरीक्षक भगवंत घोडे करीत आहेत.

Story img Loader