जळगाव – जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील १४ टन लोणी (बटर) आणि नऊ टन दूध भुकटी चोरी आणि अपहाराच्या आलेल्या तक्रारींचा प्राथमिक अभ्यास करीत पोलिसांकडून सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल झाल्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक संदीप सुरेशसिंग परदेशी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या अर्जानुसार दूध संघातील लोणी व दूध भुकटीच्या अपहाराचा गुन्हा दाखल झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं षडयंत्र; आ. एकनाथ खडसेंचा आरोप

हेही वाचा >>> “त्या ज्येष्ठ नेत्याने पोलीस ठाण्यासमोर झोपणे अयोग्यच”, पालकमंत्री गुलाबराव पाटील स्पष्टच म्हणाले..

११ ऑक्टोबर रोजी चाळीसगावचे आमदार चव्हाण यांनी पोलीस अधीक्षकांना अर्ज दिला होता. दूध संघातून सुमारे १४ टन लोणी (बटर) आणि आठ ते नऊ टन म्हशीच्या दुधाची भुकटी अशा सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये मालाची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचे अर्जात म्हटले होते. ही विल्हेवाट दूध संघाचे अध्यक्ष, कार्यकारी संचालक आणि काही मोजक्या कर्मचार्‍यांनी अत्यंत नियोजन पद्धतीने लावलेली असल्याचेही अर्जात नमूद आहे. मनोज लिमये (५९ रा. दूध संघ कॅम्पस, जळगाव) यांच्या १२ ऑक्टोबरच्या जबाबानुसार ते दूध संघात कार्यकारी संचालक म्हणून मार्च २०२२ पासून कार्यरत असून, त्यांच्यावर नियंत्रण हे संचालक मंडळाचे असल्याने दूध संघाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असल्याचे म्हटले आहे. आठ ऑक्टोबरच्या रात्री साडेनऊ वाजता लिमये यांनी संदीप झाडे, स्वप्नील जाधव, नितीन पाटील, महेंद्र केदार यांना विक्री विभागातील पांढर्‍या लोण्याचा साठा तपासणीचे निर्देश दिले असता, त्यांच्या तपासणीत दोन ऑक्टोबर रोजी १४ टन पांढरे लोणी (७० ते ८० लाख रुपये किंमत) मालाची वाई (जि. सातारा) येथे शीतगृहात पाठविल्याची नोंद साठा वहीत घेण्यात आली आहे; परंतु असे प्रत्यक्षात कोणतेही वाहन नमूद साठा घेऊन दूध संघाच्या बाहेर गेलेले नाही. याची दरवाजावरील आत आणि बाहेर पुस्तिकेत नोंद नाही, तपासणीत दोन ऑक्टोबर रोजी घेण्यात आलेली नोंद ही खोटी असल्याचे तपासणी पथकाच्या निदर्शनास आले आहे, तसेच पथकाला अभिलेखानुसार नऊ मेट्रिक टन दूध पावडरची तफावत आढळून आली असून, त्याची किंमत ३० ते ३५ लाख रुपये आहे. असा एकंदरीत एक कोटी, १५ लाख रुपयांचा अपहार झाला असल्याचे लिमये यांच्या तक्रारीत नमूद आहे.

हेही वाचा >>> दत्तक नाशिक परत करा ; मनसेचे संदीप देशपांडे यांची मागणी

लिमये यांनी १२ ऑक्टोबर रोजी दिलेल्या जबाबात अपहार असे तर, दुसऱ्याच दिवशी पोलीस निरीक्षक, जळगाव शहर पोलीस ठाणे यांच्या नावाने दिलेल्या तक्रारीत अपहार नसून चोरी झाली, असे नमूद केले होते. तिन्हीही तक्रारींच्या प्राथमिक चौकशीत प्रथमदर्शनी अनंत अंबिकर, महेंद्र केदार यांनी त्यांच्या नियंत्रणातील विभागात असलेल्या यंत्रणेत अफरातफर केल्याचे आणि खोट्या नोंदी केल्याचे आढळून आले असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

हेही वाचा >>> साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

असा आहे घटनाक्रम

जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात सहा लाखांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार तथा दूध संघाचे मुख्य प्रशासक मंगेश चव्हाण यांनी दिली होती. त्यानंतर दूध संघातील मालाची चोरी झाली असल्याने याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार एकनाथ खडसे यांनी करीत जळगाव शहर पोलीस ठाण्यात रात्रभर ठिय्या मांडला होता. यानंतर चव्हाण आणि खडसे यांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला होता. दुसरीकडे पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल न केल्याने खडसे यांनी न्यायालयात धाव घेतली. हे चोरीचे प्रकरण असून, पोलीस दबावाखाली काम करीत आहेत. आमदार चव्हाण हे संघाचे सभासददेखील नाहीत. त्यामुळे त्यांना माहिती कशी मिळते, असा प्रश्‍नही उपस्थित केला.

मला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. त्यासंदर्भात मला स्थानिक गुन्हे शाखेच्या एका पोलीस कर्मचार्‍यांकडून सांगण्यात आले. जिल्हा दूध संघातील चोरी व अपहाराबाबत सहायक निरीक्षक संदीप परदेशी यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. हा खोटा गुन्हा दाखल केला असून, संघाच्या कार्यकारी संचालकांच्या तक्रारीवर फिर्याद दाखल करायला हवी होती. मात्र, आमदार मंगेश चव्हाणांच्या अर्जानुसार फिर्याद दाखल केली आहे.

– आमदार एकनाथ खडसे

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Case filed against malpractice milk union action taken as per complaint mangesh chavan ysh