लोकसत्ता प्रतिनिधी
नाशिक : समाजमाध्यमात धार्मिक तेढ निर्माण करणारी दृकश्राव्य चित्रफित टाकणाऱ्या संशयितांविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनसेने भोंग्याविरुध्द आंदोलनाचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर, तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी १० एप्रिल २०२२ रोजी चार मिनिटे ४२ सेकंदाची एक चित्रफित तयार केली होती. कायदा व सुव्यवस्थेसाठी पाण्डेय यांनी या अनुषंगाने काही निर्बंध जाहीर केले होते. त्यामध्ये त्यांनी आदेश निर्गमित करत त्यामागील पार्श्वभूमी स्पष्ट केली होती. या चित्रफितीचा संशयितांनी फायदा उचलत त्यामध्ये छेडछाड केली. तसेच सद्यस्थितीत पाण्डेय शहराचे पोलीस आयुक्त नसतानाही चित्रफितीमध्ये दाखविण्यात आले आहे.
आणखी वाचा-जातीपातीसह धार्मिक राजकारणापासून दूर – अजित पवार यांचे प्रतिपादन
एका समाजाच्या प्रार्थनेवेळी इतर धर्मियांना हनुमान चालिसाचे पठण करण्यास मनाई असल्याची २४ सेकंदाची चित्रफित समाज माध्यमात टाकण्यात आली. या संदेशामुळे दोन धर्मियांमध्ये असुरक्षिततेची तसेच द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न समाजकंटकांनी केला आहे. ही चित्रफित तयार करणारे, त्यात बदल करणारे तसेच प्रसारित करणाऱ्या संशयितांविरूध्द सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागरिकांनी अशाप्रकारची चित्रफित समाज माध्यमात इतरांना पाठवू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुभाष ढवळे यांनी दिला आहे.
© The Indian Express (P) Ltd