नाशिक : नांदगाव मतदारसंघात उमेदवारांमधील वाद, समर्थकांची धक्काबुक्की प्रकरणी चार, वाहनात पैसे आढळल्याने दोन तर, गाडीत मद्याच्या बाटल्या सापडल्याने एक असे एकूण सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उमेदवारांमधील वाद, धक्काबुक्की प्रकरणी शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) उमेदवार आमदार सुहास कांदे, राष्ट्रवादीचे माजी खासदार तथा अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यासह २०० ते २५० कार्यकर्त्यांविरुध्द वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
मतदानाच्या दिवशी बाहेरील शेकडो लोकांना आणल्यावरून नांदगावमध्ये शिवसेनेचे उमेदवार कांदे आणि अपक्ष उमेदवार भुजबळ यांच्यातील संघर्ष समर्थकांना धक्काबुक्की, धमक्या देण्यापर्यंत गेल्याने तणावाची स्थिती निर्माण झाली होती. भुजबळ यांनी आपले वाहन रस्त्यात आडवे लावून बाहेरून आलेल्या लोकांची वाहने काही वेळ रोखून धरल्याने कांदे आणि भुजबळ समर्थकांमध्ये वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. यावेळी कांदे हे भुजबळ यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना मारण्याची धमकी दिल्याची तक्रार आहे. दुसरीकडे, मतदानासाठी बाहेरून आलेल्या स्थानिक ऊसतोड कामगारांना भुजबळांनी जाणीवपूर्वक रोखले, त्यांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप कांदे यांनी केला. याच मतदारसंघातील दुसऱ्या घटनेत साकोरे येथे पैशांनी भरलेली गाडी आढळल्याने तणाव निर्माण झाला होता. यावेळी नोटा उधळून एकाने धुडगूस घातला गेला. ही गाडी समीर भुजबळ यांची असल्याचा आरोप अपक्ष उमेदवार डॉ. रोहन बोरसे यांनी केला होता. एका मतदान केंद्राबाहेर जमलेल्या कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला होता. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर पोलिसांनी या सर्व घटनांप्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.
हेही वाचा…महिला वाहकांच्या सतर्कतेमुळे चोर जाळ्यात
निवडणूक आयोगाचे फिरते पथक आणि पोलीस यांनी तक्रार दिल्यानंतर उमेदवारांमधील वाद प्रकरणी चार, साकोरा येथील पैसे पकडल्या प्रकरणी दोन तर गाडीत दारुच्या बाटल्या सापडल्याने एक गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये आचार संहिता भंग, शिवीगाळ, दमदाटी, मारण्याची धमकी, रस्ता अडवणे, मतदारांना प्रलोभन, मतदारांना मतदानापासून प्रतिबंध करणे, जमाव गोळा करणे, तडीपारी असलेल्यांची उपस्थिती आदींचा समावेश आहे. या गुन्ह्यात आमदार कांदे, माजी खासदार भुजबळ यांच्यासह त्यांचे २०० ते २५० समर्थक कार्यकर्ते यांचा संशयितांमध्ये समावेश आहे.