जळगाव: चाळीसगाव येथील रेल्वेस्थानकाजवळील मालधक्का भागात मोटारीतून नऊ गोण्यांमधील सुमारे १८ लाख २ हजार ४०० रुपये किमतीची अफूची बोंडे व बोंडाचा चुरा, तसेच १० लाखांची मोटार मिळून सुमारे २८ लाख २ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चालकाविरुद्ध चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चाळीसगाव येथे शहर पोलीस ठाण्यातर्फे काही दिवसांपासून नशामुक्त चाळीसगाव शहर अभियान राबविण्यात येत आहे. त्यात प्रथम चाळीसगाव पालिकेच्या मदतीने अवैध दारू विक्रेत्यांची ठिकाणे नष्ट करण्यात आली. सोबतच पोलिसांनी चायनीज सेंटर, सोडा वॉटर, अंडाभुर्जी विक्रेत्यांवर गस्त ठेवून सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्‍यांवर धडक कारवाई करण्यात आली. शहरातील हॉटेल व बार विक्रेत्यांची पोलीस ठाण्यात बैठक घेऊन त्यांना वेळेत हॉटेल व बार बंद करण्याबाबत सूचना देण्यात आल्या. न जुमानणार्‍या बार आस्थापनांवर कारवाई करण्यात आली होती. अवैधरीत्या अमली पदार्थ, गांजा विक्री करणार्‍यांविरुद्ध दोन गुन्हे, तसेच मद्यप्राशन करणार्‍यावर तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा… जळगाव जिल्ह्यात पितृपक्षामुळे भाजीपाला कडाडला

अमली पदार्थ वाहतुकीवर व विक्री करणार्‍यांवर कारवाईसाठी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांनी पथक नियुक्त केले आहे. रविवारी उपनिरीक्षक सुहास आव्हाड हे गस्त घालत असताना चाळीसगाव शहरातील कोतकर महाविद्यालयाजवळ मोटारीवर संशय बळावला. त्यामुळे चालकास थांबण्याचा इशारा दिला. मात्र, त्याने भरधाव मोटार नेली. गस्तीवरील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तत्काळ एकमेकांशी संपर्क करून शहरातील मुख्य रस्त्यावर मोटार अडविण्याचा प्रयत्न केला. चालकास पळून जाण्यासाठी मार्ग न मिळाल्याने त्याने रेल्वेस्थानकाजवळील मालधक्क्यावर मोटार सोडून पलायन केले.

हेही वाचा… संजय राऊत यांच्या विरोधात मालेगावात बदनामीचा खटला, दादा भुसे यांच्यावरील आरोप प्रकरण

मोटारीमध्ये गोण्या व गोण्यांच्या बाजूला अफूची बोंडे व बोंडाचा चुरा पडलेला दिसला. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना माहिती कळविण्यात आली. त्यांनी सहायक पोलीस अधीक्षक अभयसिंह देशमुख यांची लेखी परवानगी घेत लगेच दोन शासकीय पंच, वजनमापे निरीक्षक यांना पोलीस ठाण्यात बोलावून घेण्यात आले. पथकाने मुद्देमालाची पाहणी केली. त्यात नऊ गोण्यांमध्ये अफूची बोंडे, बोंडाचा चुरा (अमली पदार्थ) मिळून आला. याप्रकरणी चाळीसगाव येथील शहर पोलीस ठाण्यात मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. उपनिरीक्षक सुहास आव्हाड, विनोद भोई, उज्ज्वलकुमार म्हस्के तपास करीत आहेत.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cash worth 28 lakhs seized in chalisgaon jalgaon along with crushed opium dvr
Show comments