नाशिक: कोयत्याने केक कापून कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करताना समाजमाध्यमात झळकलेले इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांना पालकमंत्री दादा भुसे यांनी उपरोधिक शब्दात कानपिचक्या दिल्या. या प्रकाराबाबत माहिती घेण्यात येईल, त्यात तथ्य असल्यास खोसकर यांना सार्वजनिक जीवनात असे वागणे योग्य नसल्याचा खासगीत सल्ला देईल, असे भुसे यांनी नमूद केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> त्यांना मंत्रिपदापेक्षा दूध संघ महत्त्वाचा : एकनाथ खडसे

इगतपुरी-त्र्यंबकेश्वरचे काँग्रेसचे आमदार खोसकर यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्याच्या साजरा झालेल्या वाढदिवसाची चित्रफित समाजमाध्यमात पसरली आहे. कार्यकर्त्याचा वाढदिवस धारदार कोयत्याने केक कापून साजरा झाला. त्यात खोसकरही सहभागी झाल्याचे दिसत आहे. या प्रकरणी कार्यक्रम आयोजकावर घोटी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु, त्यात खोसकर यांच्या नावाचा उल्लेख नाही. शहर परिसरात असे प्रकार घडल्यास पोलिसांकडून संबंधितांवर कठोर कारवाई केली जाते. या प्रकरणात पोलिसांनी सौम्य भूमिका स्वीकारली आहे. या संदर्भात उपस्थित प्रश्नावर या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. शुक्रवारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या पत्रकार परिषदेत खोसकर यांनी कोयत्याने केक कापण्याच्या प्रकाराबद्दल प्रश्न उपस्थित झाल्यावर त्यांनी याबाबत आपणास माहिती नसल्याचे नमूद केले. पण नियम सर्वांसाठी सारखेच असतात. या प्रकाराबाबत माहिती घेतली जाईल. आमदारांनी कोयत्याने वाढदिवसाचा केक कापला असल्यास खोसकरांना सार्वजनिक जीवनात असे वागणे योग्य नसल्याचा खासगीत सल्ला दिला जाईल, असे भुसे यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Celebrating activist birthday cutting a cake weapon dada bhuse congress mla ysh