नंदुरबार – राज्यात अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना जास्तीच्या पैशाची आवश्यकता वाटल्यास आणि राज्याकडून मागणी झाल्यास अधिकच्या मदतीसाठी केंद्र विचार करेल, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. दर्जेदार अन्न निर्मितीसाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन आणि प्रशिक्षण मिळाल्यास देशातील प्रत्येक गाव स्वावलंबी आणि गरीबीमुक्त होईल. नैसर्गिक शेतीसाठी केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी सांगितले.

सोमवारी येथील कृषी विज्ञान केंद्रात कृषी विज्ञान मंडपम सभागृह आणि महिला तंत्रज्ञान पार्कचे उदघाटन केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते झाले. यावेळी मार्गदर्शन करताना चौहान यांनी जिल्ह्यातील काही गावांमध्ये नैसर्गिक शेतीला चालना देण्याची गरज मांडली. नैसर्गिक शेतीसाठी भारत सरकार शेतकऱ्यांना सदैव प्रोत्साहन देत असून त्यासाठी लागणाऱ्या प्रयोग व औजारांसाठी केंद्र सरकार प्रति एकर रुपये चार हजारांचे सहाय्य करीत आहे. तापी नदीच्या उपलब्ध पाण्याचा वापर शेतीसाठी करायला हवा. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेतून तुषार सिंचनाचे प्रयोग करून शेतात पाणी मुरवता येऊ शकेल. कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून येथील महिलांनी भगरपासून बिस्किटे बनवली आहेत, दाळीवर प्रक्रिया करणारी यंत्रे विकसित केली आहेत. आज अशाच छोट्या प्रयोगांमधून देशात सुमारे एक कोटी ४८ लाख महिला लखपती दिदी झाल्या आहेत, असे चौहान यांनी सांगितले.

यावेळी राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी मनोगत व्यक्त केले. शेती हा अत्यंत गुंतागुतीचा विषय असून शाश्वत शेतीशिवाय शेतकरी त्यात रमत नाही. शेती व्यवसायातून स्थलांतरित होण्याची मानसिकता मोठ्या प्रमाणात असताना कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी सुरू असलेले प्रयत्न नक्कीच शाश्वत शेतीतून या भागाचा कायापालट केल्याशिवाय राहणार नाहीत, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमानंतर कुठलाही लवाजमा न बाळगता मंत्री चौहान थेट लोकांमध्ये गेले. शेती समस्येबाबत संवाद साधला.

यावेळी शेतकरी मेळावा, बचत गटांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमात पुण्यातील योजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. गजानन डांगे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाचे अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित, आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमशा पाडवी, राजेश पाडवी, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विजय माहेश्वरी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आदि उपस्थित होते.