नाशिक : केंद्र सरकार रेल्वेची नवीन प्रादेशिक जलद वाहतूक प्रणाली अंमलात आणत आहे. प्रगत देशात १०० ते २५० किलोमीटर अंतरावरील मोठ्या शहरांत प्रादेशिक जलद रेल्वे वाहतूक केली जाते. याच संकल्पेनेवर आधारित पहिली नमो भारत जलद रेल्वे दिल्ली-मेरठ दरम्यान धावली. दुसरी प्रायोगिक चाचणी गांधीधाम ते अहमदाबाद दरम्यान करण्यात आली. देशभरात हे प्रकल्प आता राबविले जाणार आहेत, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.

शुक्रवारी रेल्वे सुरक्षा दलाच्या नाशिकरोड येथील विभागीय संस्थेत ४० व्या आरपीएफ स्थापना दिवसाचा कार्यक्रम वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नव्या जलद वाहतूक प्रणालीतून नाशिक-मुंबई आणि नाशिक-पुणे अशा मोठ्या शहरांना रेल्वेने जोडण्याचा प्रश्नही मार्गी लागणार असल्याचे सांगितले. नाशिक-शिर्डी रेल्वे मार्गाने जोडणे अतिशय गरजेचे आहे. मनमाडहून अहमदनगर आणि दौंड रेल्वेमार्गाची क्षमता वाढविली जात आहे. या माध्यमातून नाशिकचा दक्षिण भारताला जोडण्याचा मार्ग खुला होईल. पुणे रेल्वे स्थानकाचा दोन टप्प्यात विकास केला जात आहे. उरळी आणि हडपसर येथे मेगा टर्मिनसचे काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे पुण्याला विविध भागातून येणाऱ्या रेल्वे गाड्यांची क्षमता दुप्पट होईल, असे वैष्णव यांनी सांगितले.

हे ही वाचा…नाशिक : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन

महाराष्ट्रात सध्या १३२ रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे. १.६४ लाख कोटी रुपयांचे विविध प्रकल्प बांधकामाच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. यामध्ये रेल्वे उड्डाण पूल, भुयारी मार्ग, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण आणि तिप्पट करणे, नव्या रेल्वे मार्गांची बांधणी आदींचा समावेश आहे. नाशिकरोड येथील विभागीय प्रशिक्षण संस्थेच्या विकासासाठी ३५ कोटी रुपयांचे अनुदान वैष्णव यांनी जाहीर केले. कृषी मालाच्या वाहतुकीसाठी रेकची नवीन रचना तयार केली जात आहे. जेणेकरून रेल्वेद्वारे कृषिमालाच्या वाहतुकीला प्रोत्साहन मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

हे ही वाचा…नाशिक : सफाई कर्मचारी हत्या प्रकरणी तिघांना कोठडी

‘जीमआरटी ’मुळे नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचा नव्याने सविस्तर प्रकल्प अहवाल प्रस्तावित नाशिक-पुणे द्रुतगती रेल्वेमार्गाविषयी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी भाष्य केले. हा प्रकल्प रेल्वे मंत्रालयाच्या प्राधान्यक्रमात आहे. नारायणगावजवळील ‘जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप’(जीएमआरटी) या आंतरराष्ट्रीय प्रकल्पाच्या कामकाजात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा नवीन सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार केला जात आहे. या प्रकल्पाच्या आसपास विद्युतीकरण नको असल्याने प्रकल्प स्थळापासून किमान १० किलोमीटर दुरून प्रस्तावित रेल्वे मार्ग जाईल, असे रचनेत बदल करण्यात येत आहेत. लवकरच जीएमआरटी दुर्बिणीसभोवतालचे संरेखन पूर्ण होऊन नाशिक-पुणे रेल्वे मार्गाचा प्रकल्प आकार घेईल, असे वैष्णव यांनी नमूद केले.