संपास संमिश्र प्रतिसाद

नाशिक : केंद्र सरकारच्या कामगार, कर्मचारी, वैद्यकीय प्रतिनिधी, आरोग्य सेवक यांनी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी अनंत कान्हेरे मैदान परिसरातून मोर्चा काढण्यात आला. शिवाजी रस्त्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या मोर्चामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाल्याने नाशिककरांना पुन्हा एकदा कोंडीला तोंड द्यावे लागले.

आयटकसह देशातील विविध कामगार, कर्मचारी संघटनांनी देशव्यापी संपाची हाक दिली होती. संपात सामील झालेल्या संघटनांच्या वतीने अनंत कान्हेरे मैदानापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चामुळे वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी वाहतूक मार्गात बदल केला. या बदलाची पूर्वकल्पना वाहनचालक तसेच पादचाऱ्यांना नसल्याने त्यांना वेगवेगळ्या अडचणींना तोंड द्यावे लागले. विद्यार्थी, नोकरदारांना इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी धावपळ करावी लागली.

मोर्चा शालिमारमार्गे शिवाजी रस्त्यावर आला असता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, राजू देसले, सुनंदा जरांडे यांच्यासह अन्य कामगार नेत्यांनी मार्गदर्शन केले. केंद्र सरकारच्या मनमानी कारभाराविषयी ताशेरे ओढत प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याची मागणी या वेळी करण्यात आली.

उन्हापासून बचाव करण्यासाठी अनेकांनी रस्त्यावरील दुकानाचा आडोसा घेत त्याच ठिकाणी ठाण मांडले. केंद्र आणि राज्य सरकारने मागण्या मंजूर कराव्यात, राज्यात कार्यरत ‘आशा’ गटप्रवर्तकांना राज्य शासनाने त्वरित मानधन द्यावे, मनरेगाअंतर्गत कार्यरत ग्रामरोजगार सेवकांना प्रवास भत्ता देण्यात यावा, जिल्हा परिषद सेसमधून दीपावली भेट देण्याचा निर्णय घेण्यात यावा, बांधकाम कामगार, मोलकरीण मंडळ, यंत्रमाग मंडळासाठी स्वतंत्र कर्मचारी पूर्ण वेळ नेमावा, अशी मागणी आयटकच्या वतीने करण्यात आली. महाराष्ट्र राज्य किसान सभेने महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेत दोन लाखांवरील कर्जधारकांचा तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा समावेश करावा, संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी, पीक कर्जासोबत बंद उपसा जलसिंजन संस्था, मध्य मुदतीचे कर्ज आणि शेतीपूरक उद्योग कर्ज, शेडनेटसाठीचे कर्ज आदी कर्जाचा समावेश कर्जमुक्ती योजनेत करा, या मागण्या करण्यात आल्या.   संयुक्त कृती समितीअंतर्गत ऑल इंडिया पोस्टल एम्प्लॉइज युनियनसह अन्य समविचारी संघटनाही मोर्चात सहभागी झाल्या होत्या.

  दैनंदिन कामकाजावर परिणाम

संपाचा संमिश्र परिणाम शहरातील दैनंदिन कामकाजावर दिसून आला. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागात शुकशुकाट होता. कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना संपाची पूर्वकल्पना नसल्याने आल्या पावली माघारी फिरावे लागले. अत्यावश्यक सेवेच्या कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावत दैनंदिन काम सुरू ठेवले. शालेय विद्यार्थी वाहतूक सेवा विस्कळीत झाली. नियमित वेळेत येणारी व्हॅन, रिक्षा घरी न आल्याने विद्यार्थ्यांना शाळेची तयारी करूनही घरीच राहावे लागले. त्यामुळे बहुतांश शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती बोटावर मोजण्याइतकी राहिली. जिल्हा शासकीय रुग्णालयात चतुर्थ श्रेणी कामगारांनी संपात सहभाग घेतल्याने स्वच्छताविषयक कामावर ताण पडला. संपाची पूर्वकल्पना असल्याने रुग्णालय व्यवस्थापनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांची सेवा घेत स्वच्छता केली. परंतु, चतुर्थ श्रेणीचे सर्व कर्मचारी या संपात सहभागी झाल्याने रुग्णालय परिसरात काही प्रमाणात अस्वच्छता राहिली. टपाल सेवा विभागाच्या काही संघटना संपात सहभागी झाल्याने टपाल सेवेवर परिणाम झाला. पत्रांचा बटवडा झाला असला तरी पोस्टमनही संपात सहभागी असल्याने पत्रांचे गठ्ठे पडून राहिले.