जळगाव : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची मुक्ताईनगरातील यात्रेत छेड काढल्याच्या संशयावरुन पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेल्या सातपैकी चार संशयितांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.
मुक्ताईनगरातील कोथळीत सुरू असलेल्या संत मुक्ताईच्या यात्रेत केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह तिच्या मैत्रिणींची शुक्रवारी छेड काढल्याचा प्रकार घडला. टवाळखोरांनी यावेळी सुरक्षा रक्षकालाही धक्काबुक्की केली होती. त्यामुळे सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीवरून अनिकेत भोई, पीयुष मोरे, सोहम कोळी, अनुज पाटील, किरण माळी, चेतन भोई आणि सचिन पालवे या सात संशयितांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. परंतु, दोन दिवस उलटूनही पोलिसांनी कोणालाच अटक न केल्याने संतप्त केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी रविवारी थेट पोलीस ठाणे गाठून अधिकाऱ्यांना त्याबद्दल जाब विचारला. मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात आली आहे. माझीच मुलगी सुरक्षित नाही तर इतरांचे काय?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामाध्यमातून पोलीस कोणाच्या तरी दबावाखाली येऊन काम करत असल्याचा आणि त्यामुळेच मुलीच्या छेडछाडसारख्या गंभीर गुन्ह्यातील संशयितांना अटक करण्यात विलंब केला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यांचे सासरे आणि राष्ट्रवादी (शरद पवार) ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांनीही मुक्ताईनगरात अलीकडे मोठ्या प्रमाणात गुंडगिरी वाढली असून, त्यास स्थानिक लोकप्रतिनिधींचा राजाश्रय कारणीभूत असल्याचा आरोप करत अप्रत्यक्षपणे शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला होता.
मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही घडल्या प्रकाराची तातडीने दखल घेत संशयितांना तातडीने अटक करण्याचे आदेश पोलीस यंत्रणेला दिले. त्यानुसार, रविवारी सायंकाळपर्यंत किरण माळी याच्यासह एका अल्पवयीन मुलाला मुक्ताईनगर पोलिसांनी ताब्यात घेतले होते. रविवारी रात्री उशिरा अनिकेत भोई (२६) आणि अनुज पाटील (१९) या दोघांना अटक करण्यात आली. पोलिसांकडून उर्वरित संशयितांचाही शोध सुरू असल्याचे सांगून त्यांचा या गुन्ह्यात खरोखर सहभाग आहे की त्यांची नावे टाकली गेली आहेत, याची पडताळणी करण्यात येत असल्याचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी नमूद केले.