अकरावीसाठी केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया अशक्य
मुंबई व पुण्याप्रमाणे नाशिक शहरातही अकरावी प्रवेशासाठी केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्याची वारंवार मागणी होत असली तरी २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत ती राबविणे अशक्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी सकारात्मक विचार झाला असून शासनाकडून उपरोक्त निर्णयास मान्यता मिळण्यास काही अवधी आहे. यामुळे यंदा अकरावीची प्रवेश प्रक्रिया नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने होणार असल्याने विद्यार्थ्यांना दोन ते तीन महाविद्यालयात अर्ज भरण्याची कसरत करावी लागणार आहे.
दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थी व पालकांचे संपूर्ण लक्ष अकरावी प्रवेशाकडे लागले आहे. उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि जिल्ह्यात अकरावीसाठी उपलब्ध जागा यांच्या प्रमाणात काहीअंशी तफावत असली तरी तंत्रनिकेतन व औषधनिर्माण शास्त्र पदविकेसाठी जाणारे विद्यार्थी लक्षात घेतल्यास विद्यार्थ्यांच्या प्रवेशात कोणताही अडसर येणार नसल्याचे प्रभारी शिक्षण उपसंचालक नवनाथ औताडे यांनी स्पष्ट केले. गतवर्षी दहावीत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण जवळपास इतकेच होते. या स्थितीत अकरावीच्या १५ ते २० टक्के जागा रिक्त राहिल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण जिल्ह्यात अकरावीसाठी एकूण ६५ हजार २८० जागा उपलब्ध आहेत. त्यातील जवळपास १९ हजार जागा एकटय़ा नाशिक शहरातील आहेत. नाशिक शहरात केंद्रीयभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा आग्रह धरला जात आहे. काही विद्यार्थी संघटनांनी ही मागणी उचलून धरली. या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबवल्यास विद्यार्थी व पालकांची विविध महाविद्यालयात अर्ज भरण्यासाठीची धावपळ कमी होईल, शिवाय आर्थिक नुकसानही टळेल. परंतु, केंद्रीयभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पार पाडण्यासाठी शासनाकडून अध्यादेश निर्गमित करावा लागणार आहे.
त्यासंबंधीचा प्रस्ताव शिक्षण विभाग पाठवत असली तरी हे परिपत्रक निघण्यास काही कालावधी जाईल. त्यामुळे नाशिक शहरात यंदाच्या शैक्षणिक वर्षांत केंद्रीयभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविता येणार नसल्याचे औताडे यांनी स्पष्ट केले. यामुळे नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी धावपळ करावी लागणार आहे. मुंबई व पुण्याप्रमाणे नाशिकमध्ये केंद्रीयभूत पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा आदेश पुढील पाच ते सहा महिन्यात येऊ शकतो. त्यामुळे या पद्धतीची अंमलबजावणी पुढील शैक्षणिक वर्षांपासून करता येईल, असेही त्यांनी सूचित केले. पारंपरिक पद्धतीने ही प्रक्रिया राबविली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना आपल्या आवडीच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी दोन ते तीन महाविद्यालयांमध्ये अर्ज भरणे क्रमप्राप्त ठरणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत माहिती देण्यासाठी विभागीय मंडळातील प्राचार्याची जिल्हावार बैठक होणार आहे. धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील प्राचार्याची बैठक ९ जून रोजी दोंडाईचा येथे होईल. जळगाव जिल्ह्यातील प्राचार्याची बैठक १० जून रोजी तर नाशिक जिल्ह्यातील प्राचार्याची बैठक ११ जून रोजी होणार आहे. त्यावेळी अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा